मुंबई ः प्रतिनिधी
कंगना रणौतने मुंबई, मुंबईकर व महाराष्ट्र यांना शहाणपण शिकवण्याची गरज नसल्याचे सांगत भाजपला त्याच्याशी जोडणे दुर्देवी व चुकीचे असल्याचे भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी शुक्रवारी (दि. 4) येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. या वेळी त्यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणामध्ये चौकशीतल्या गोष्टींचा विपर्यास किंवा दुसर्या दिशेने नेण्यासाठी कंगना रणौतच्या पाठीमागे राहून वार करण्याची गरज नसल्याचेही बोलून दाखवले.
अभिनेत्री कंगना रणौतने मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी वाटत असल्याचे खळबळजनक वक्तव्य केल्याने सध्या वाद निर्माण झालेला आहे. यावरून राजकीय पक्षांमध्येदेखील आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचे दिसत आहे. भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी याबाबची पक्षाची भूमिका स्पष्ट करीत संजय राऊत यांनी भाजपवर केलेल्या टीकेलादेखील उत्तर दिले.
आशिष शेलार म्हणाले की, सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणातून जेवढी वळणे, या चौकशीला वेगवेगळ्या दिशेने नेता येईल तेवढा प्रयत्न काही राजकीय मंडळी वारंवार करत आहेत. हे महाराष्ट्र व देश बघतो आहे. आजच ज्या पद्धतीचे वक्तव्य संजय राऊत यांनी केले त्यावर आमची स्पष्ट भूमिका आम्ही मांडत आहोत. कंगना रणौतने मुंबई, मुंबईकर व महाराष्ट्र यांना शहाणपण शिकवण्याची गरज नाही. त्यामुळे अशा पद्धतीने कुठलेही वक्तव्य कंगनाने केले असेल, तर त्याच्याशी आम्ही असहमत आहोत.
संजय राऊत यांनादेखील आमचे सांगणे आहे की, सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणामध्ये चौकशीतल्या गोष्टींचा विपर्यास किंवा दुसर्या दिशेने नेण्यासाठी कंगना रणौतच्या पाठीमागे राहून वार करण्याची गरज नाही. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू असताना, कुठल्याही अशा पद्धतीच्या वक्तव्यावर वातावरण तापवण्यापासून सगळ्यांनी स्वतःला वाचवले पाहिजे, असेदेखील शेलार यांनी या वेळी बोलून दाखवले.
कंगनाचे आव्हान अन् सर्वपक्षीयांकडून समाचार
दरम्यान, ‘बरेच लोकं मला मुंबईत परत येऊ नकोस अशी धमकी देत आहेत. म्हणून मी येत्या आठवड्यात 9 सप्टेंबर रोजी मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा मी मुंबई विमानतळावर उतरेन तेव्हा पोस्ट करेन. कोणाच्या बापाची हिंमत असेल तर थांबून दाखवा’ या आशयाचे ट्विट कंगनाने केले आहे. यावरून तिच्यावर टीका होत असून, सर्वच पक्षांनी तिला खडे बोल सुनावले आहेत.
Check Also
केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …
RamPrahar – The Panvel Daily Paper