मुंबई : प्रतिनिधी
प्रतिष्ठेची मुंबई मॅरेथॉन रविवारी (दि. 19) होणार असून, या स्पर्धेत दौड लगावण्यासाठी मुंबईकर देशी-विदेशी धावपटू सज्ज झाले आहेत. या वेळी वेगाने धावण्याबरोबरच गुलाबी थंडी आणि वाहणारे बोचरे वारे यांचा सामना धावपटूंना करावा लागणार आहे. अमेरिकेच्या नामवंत जिम्नॅस्टिक्सपटू शॅनल ली मिलर या मुंबई मॅरेथॉनच्या सदिच्छादूत आहेत.
यंदा मुंबई मॅरेथॉनमध्ये स्पर्धकांच्या संख्येत तब्बल 19 टक्क्यांनी वाढ झाली असून, सुमारे 55 हजार धावपटू रविवारी मुंबईच्या रस्त्यांवर धावताना दिसतील. 42.195 किमीची पूर्ण मॅरेथॉन, 21 किमीची अर्धमॅरेथॉन, हौशी धावपटूंसाठी ‘ड्रीम रन’, 10 किमी शर्यत, वरिष्ठ, दिव्यांग अशा वेगवेगळ्या गटांत धावपटू सहभागी होणार आहेत.
केनियाचा कॉसमस लगट आणि इथिओपियाची वर्कनेश अलेमू या गतविजेत्यांच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. गेल्या वर्षी या दोघांनी मुंबई मॅरेथॉनमधील वेगवान वेळेची नोंद केली होती. त्यामुळे या दोघांनाच विजेतेपदाचे दावेदार मानले जात आहे.
भारतीयांमध्ये सेनादलाच्या श्रीनू बुगाथा आणि ऑलिम्पियन सुधा सिंग यांनी मुंबई मॅरेथॉनद्वारे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील आपली जागा निश्चित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. अर्धमॅरेथॉनमध्ये राष्ट्रीय विक्रमवीर अविनाश साबळे आणि मोनिका आथरे, तसेच स्वाती गाढवे विजेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक आहेत.
Check Also
पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …