प्रतिकूल हवामानाचा फटका
सुधागड ः प्रतिनिधी
सुधागडसह रायगडात आंब्यासह काजू पीकही प्रतिकूल हवामानाचे शिकार ठरत आहे. फवारणी न झालेले आंबा व काजू पीक धोक्यात आले आहे. आंबा व काजूचे यंदा जेमतेम 50 टक्के उत्पादन हाती येईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. कधी थंडी तर कधी ढगाळ वातावरण असल्याने आंब्यासह काजू पिकाला बसणारा फटका शेतकर्यांना सहन करावा लागत आहे. कोकणात आंबा व काजू ही दोन्ही पिके शेतकर्यांच्या आर्थिक स्थितीस हातभार लावण्यासाठी महत्त्वाची ठरतात, परंतु प्रतिकूल हवामान, चक्रीवादळामुळे यंदा शेतकर्यांचा आर्थिक स्तोत्र मंदावत आहे. त्यामुळे आंबा व काजू यांच्या फळपिकांचा यंदा जवळपास दीड ते दोन महिन्यांचा कालावधी पुढे गेला. सातत्यपूर्ण थंडी मिळत नसल्याने व ढगाळ वातावरणमुळे काजू, आंबा पिकाला याचा परिणाम मोहन प्रक्रिया व फळ धारणेवर दिसून येत आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी काजू पिकांची बर्यापैकी फळधारणा झाली आहे. उशिराच्या हंगामानंतरही बर्याच ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे टी मोस्क्युटो किडीचा प्रादुर्भाव झालेला दिसून आला. अनेक ठिकाणी मोहराचा फुलोरा होण्यापूर्वी या रोगांची लागण झाल्याने काजू व आंबा पीक संकटात सापडले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात आलेल्या मोहरावर खार पडल्याने मोहर जळून गेला. ज्या ठिकाणी फवारणी योग्य पद्धतीने झाली त्या ठिकाणचा काजू, आंबा वगळता अनेक ठिकाणी मोहराची प्रक्रिया योग्य पद्धतीने झाली नाही. पुरेशी थंडी न मिळाल्यामुळे मोहर सुकून पुन्हा पालवी आली आहे. याचा फटका आता थेट आंब्यासह काजू उत्पादनावरही दिसून येणार आहे.