Breaking News

उन्हाने तप्त गवत घेतंय पेट

रानवडी येथील वणवा विझवण्यात यश

पोलादपूर ः प्रतिनिधी

पोलादपूर चरई बोरावळे मार्गालगतच्या रानवडी ते घागरकोंड रस्त्यालगत दुपारच्या उन्हाने तप्त गवतावर सायंकाळी अज्ञात व्यक्तीने बिडीकाडी, सिगारेटसारख्या वस्तू भिरकावल्याने गवत पेटून त्याचे वणव्यात रूपांतर झाले. यामुळे परिसरातील लोकवस्तीलाही धोका निर्माण झाला, मात्र सरपंच आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ग्रामस्थांच्या मदतीने या वणव्यावर नियंत्रण मिळविले. गेल्या काही वर्षांपासून ऑक्टोबर हिटदरम्यान गवत जळत डोंगर पेटण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली असताना यंदा तब्बल तीस दिवस उशिराने गवताने पेट घेण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. पोलादपूर तालुक्यातील बोरावळे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच वैभव चांदे हे बोरावळे गावाहून पोलादपूरच्या दिशेने शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या वाहनाने प्रवास करत असताना रानवडी ते घागरकोंड रस्त्यालगत दुपारच्या उन्हाने तापलेले गवत पेटून त्याचे वणव्यात रूपांतर झाल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. त्यानंतर सरपंच चांदे यांनी तत्काळ त्यांचे सहकारी निलेश मोरे यांच्या साहाय्याने आग विझवण्याचे काम सुरू केले व रानवडी येथील बोरावळे ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच सचिन जाधव यांना भ्रमणध्वनीद्वारे सतर्क केले. उपसरपंच सचिन जाधव यांनी रानवडी येथील तरुण शुभम उतेकर, भाऊ उतेकर, ओंकार कंक, राजपुरे मामा, शामिल उतेकर या सर्वांना घेऊन तत्काळ आग लागलेल्या ठिकाणी धाव घेतली व सर्वांच्या अथक प्रयत्नाने तब्बल अडीच तासांनंतर वणव्याने पसरणारी आग विझवण्यात यश आले. अज्ञात व्यक्तींनी लावलेली आग वेळीच विझवली नसती, तर रानवडी, घागरकोंड, बोरावळे, वडाचाकोंड या परिसरातील सर्व गावातील रानजमिनीतील गवत जळाले असते. त्यामुळे वन्यप्राण्यांचाही होरपळून मृत्यू होण्याची शक्यता होती. सरपंच वैभव चांदे व निलेश मोरे, उपसरपंच सचिन जाधव व सहकार्‍यांनी वणवा विझविण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने केलेल्या अथक प्रयत्नांचे परिसरामध्ये कौतुक होत आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply