Breaking News

विद्यार्थ्यांनो, स्वत:ला सिद्ध करा -डॉ. माधव वेलिन्ग

पनवेल : रामप्रहर वृत्त
स्पर्धेच्या युगात आव्हानांसोबत संधीही आहेत. त्या साध्य आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने प्रयत्नशील राहणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे माजी प्र. कुलगुरू डॉ. माधव नारायण वेलिन्ग यांनी सोमवारी (दि. 20) खांदा कॉलनी येथे केले.
मुंबई विद्यापीठ संलग्न असलेल्या व शिक्षणासह कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त महाविद्यालयाचा पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ महाविद्यालयाच्या प्रांगणात झाला. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. वेलिन्ग बोलत होते.
संस्थेचे संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. सिद्धेश्वर गडदे, कार्यकारिणी सदस्य हरिश्चंद्र पाटील, संजय भगत, नगरसेविका हेमलता म्हात्रे, कुसुम पाटील, प्राचार्य डॉ. वसंत बर्‍हाटे, उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील आदी व्यासपिठावर उपस्थित होते.
डॉ. वेलिन्ग यांनी पुढे बोलताना उत्कृष्ट इमारत, शिक्षण दर्जा, कॅम्पस, अन्य सर्व सुखसुविधा सीकेटी महाविद्यालयात आहेत.
त्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढत असल्याचे सांगून फक्त शिक्षण नाही, तर चांगले शिक्षण महत्त्वाचे असते आणि ते देण्याचे काम जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमातून होत असल्याचे गौरवोद्गार काढले. अत्यंत शिस्त व नियोजनबद्ध झालेल्या या समारंभाची त्यांनी प्रशंसाही केली.
पदवी विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. हा पूर्ण करताना पुढील करिअर यशस्वी करण्यासाठी आवडते क्षेत्र निवडा, असा मौलिक सल्ला डॉ. वेलिन्ग यांनी या वेळी विद्यार्थ्यांना दिला. तुमच्या यशात पालकांचे महत्त्वपूर्ण योगदान असते. त्यामुळे तुमच्यासोबत तुमच्या पालकांचाही या निमित्ताने सन्मान होत असून असा सन्मान करणारी ठराविक महाविद्यालये आहेत आणि त्यामध्ये सीकेटी महाविद्यालयाने गौरव करून एक चांगला पायंडा पाडला आहे, असे त्यांनी आपल्या भाषणात आवर्जून नमूद केले. जीवनाची किंमत अमूल्य आहे. त्यामुळे त्याकडे करिअरच्या माध्यमातून लक्ष देत असताना शिक्षणात उशीर आणि आळसपणा करून चालणार नाही. सतर्कता महत्त्वाची आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.
अध्यक्षीय भाषणात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी संस्थेच्या विकासात विद्यार्थी, पालक, शिक्षक, हितचिंतकांचे योगदान महत्त्वाचे आहे असून सांगून सर्वांचे आभार मानले, तसेच विद्यार्थ्यांच्या यशामुळे अभिमान व आनंद वाटत असल्याचा उल्लेख केला.  
समाधान मिळणार्‍या क्षेत्रात काम करा : लोकनेते रामशेठ ठाकूर
देशाचे आपण सुजाण नागरिक आहोत. त्यामुळे मनावर ओझे ठेवून काम करू नका, समाधान मिळणार्‍या क्षेत्रात काम करा आणि आपल्यासोबत पालकांचा गौरव वाढवा, अशा शब्दांत संस्थेचे चेअरमन, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. आपल्या मातृभाषेसोबत इतरही भाषांचे ज्ञान आत्मसात करा, चांगले आयुष्य घडविण्यासाठी आनंदाने पुढे जा, असा मौलिक सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply