संघटनकुशल जे. पी. यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जगत प्रकाश नड्डा यांची सोमवारी (दि. 20) बिनविरोध निवड करण्यात आली. भाजपच्या राष्ट्रीय निवडणूक समितीचे प्रमुख राधामोहन सिंग यांनी नड्डा यांच्या नावाची घोषणा केली. मावळते अध्यक्ष अमित शहा यांच्याकडून नड्डा यांनी सूत्रे स्वीकारली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नड्डा यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नड्डांचे नाव सूचवले होते. यामुळे त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड होईल, असे सांगण्यात येत होते. शहा यांनी गृहमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नड्डा हे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष झाले होते. लो-प्रोफाइल असलेले आणि वादग्रस्त वक्तव्यांपासून दूरच राहणारे प्रभावी नेते अशी नड्डांची ओळख आहे.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नड्डा यांचा एकमेव अर्ज आला होता. सर्व औपचारिकता झाल्यानंतर पक्षाच्या दिल्लीतील मुख्यालयात त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. नड्डा यांचा कार्यकाळ 2022पर्यंत असणार आहे. राधामोहन सिंह यांनी नड्डा यांचे नाव जाहीर केल्यानंतर मावळते अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांना निवडीचे पत्र देऊन अभिनंदन केले.
भाजपच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर जे. पी. नड्डा यांचे दिल्लीच्या पक्ष कार्यालयात जोरदार स्वागत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे माजी अध्यक्ष अमित शहा, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्यासह दिग्गज नेते या सोहळ्याला उपस्थित होते. या वेळी मोदी यांनी भाषणात नड्डा यांचे अभिनंदन करतानाच विरोधकांवर तोफ डागली.
नड्डा यांची ठळक कारकीर्द
मूळचे हिमाचल प्रदेशचे आणि बिहारमध्ये जन्मलेले जे. पी. नड्डा यांचा जन्म 2 डिसेंबर 1960 रोजी पाटण्यात झाला. तिथेच त्यांचे शालेय ते पदवीपर्यंतचे शिक्षण झाले. या काळात ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सहभागी झाले. यानंतर ते हिमाचल प्रदेशला गेले आणि तिथे एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले. मग 1993मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. प्रेम कुमार धूमल सरकारमध्ये त्यांनी आरोग्यमंत्री म्हणून काम पाहिले. नितीन गडकरी यांनी नड्डा यांना राष्ट्रीय राजकारणात आणले. यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. पक्षात चर्चेत असलेल्या नड्डा यांना 2014मध्ये नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान होताच कॅबिनेट मंत्री केले गेले. या पदाचा राजीनामा देऊन ते आता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत.