मुरुड : प्रतिनिधी
भारतीय प्रजासत्ताक दिन रविवारी (दि. 26) म्हसळा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालये, विविध शाळा, महाविद्यालयांत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.
मुरुड नगर परिषदच्या प्रांगणात उपनगराध्यक्षा नौसिन दरोगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा स्नेहा पाटील, मुख्याधिकारी अमित पंडीत यांच्यासह सर्व नगरसेवक व कर्मचारी उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली होती. आझाद चौकात नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नगरसेवक, समाजसेवक व नागरिक उपस्थित होते. यावेळी नगर परिषदतर्फे उपस्थितांना खाऊचे वाटप करण्यात आले.
तहसिलदार कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार गमन गावीत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर तहसिलदार गावीत यांच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिक सुनंदा भगत व विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थी व नागरिकांचा सत्कार करण्यात आले. सर एस. ए. शाळेतील विद्यार्थानी मतदान जनजागृती विषयी पथनाट्य सादर केले. तहसिलदार गमन गावीत, नायब तहसिलदार रविंद्र सानप, नगराध्यक्षा स्नेहा पाटील, उपनगराध्यक्षा नौसिन दरोगे आदी उपस्थित होते.