Breaking News

जोस बटलर आयपीएलबाहेर; राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का

जयपूर ः वृत्तसंस्था

आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का बसला आहे. टीमचा प्रमुख खेळाडू आणि इंग्लंडचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर पुढच्या महिन्यात यूएईमध्ये सुरू होणार्‍या 2021 हंगामाच्या दुसर्‍या टप्प्यामध्ये खेळणार नाही. बटलरने आपले नाव मागे घेतले आहे. तो आता दुसर्‍यांदा बाबा होणार आहे. त्यामुळे आता त्याला कुटुंबासोबत अधिक वेळ घालवायचा आहे. राजस्थान रॉयल्सच्या टीमने ट्विट करून ही माहिती दिली. संघाने त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले, जोस बटलर आयपीएल 2021मध्ये संघाचा भाग नसेल. जोस आणि लुसी बटलर लवकरच दुसर्‍यांदा पालक होणार आहेत. आम्ही त्यांना शुभेच्छा देतो! दरम्यान, राजस्थान रॉयल्सने बटलरच्या जागी न्यूझीलंडचा यष्टीरक्षक फलंदाज ग्लेन फिलिप्सचा संघात समावेश केला आहे. ग्लेन कॅरेबियन प्रीमियर लीगमधील बार्बाडोस रॉयल्स संघाचा भाग आहे. ग्लेन फिलिप्सने आतापर्यंत 25 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 149.70च्या स्ट्राईक रेटने 506 धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत 134 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश आहे. यामध्ये त्याने 142.28च्या स्ट्राईक रेटने 3744 धावा केल्या आहेत. यात चार शतके आणि 23 अर्धशतकांचा समावेश आहे.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply