पनवेल : रामप्रहर वृत्त : पनवेल येथील पाले बुद्रुक गावा नजिक असलेल्या फणसवाडी येथील आदिवासी वाडीतील लोकांसाठी सिटिझन्स यूनिटी फोरम (कफ) पनवेल या सामाजिक संस्थेने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये ब्लड शुगर व ईसीजी अशा तपासण्या ठेवण्यात आल्या होत्या.
शिबिराचे उद्घाटन पनवेलचे परिक्षेत्र वन अधिकारी ज्ञानेश्वर सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. कफ या संस्थेला फणसवाडी येथे दोनशे साठ एकर जागा ही वृक्षारोपणासाठी मिळाली आहे. या जागेमध्ये गेल्या दोन वर्षात जवळ-जवळ आठ हजार झाडे लावून त्यांचे अतिशय चांगल्याप्रकारे संगोपन केले आहे. तेथील लोकांना हाताशी धरून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. या प्रकल्पाचा एक भाग म्हणून तेथील लोकांच्या आरोग्याची काळजी यासाठी त्यांना मोफत तपासणी व वैदकीय सल्ला उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
प्रौढांसोबत स्त्रियांची ही तपासणी करण्यात आली. लहान मुलांची व त्यांच्या आई-वडिलांना आरोग्य शिक्षणाबाबत जनजागृती करणे हे या शिबिराचे वैशिष्ट्य ठरले. पनवेलमधील डॉ. कल्पना शेटे, डॉ. नीलिमा भांडारकर, डॉ. एस. एल. पाटकर या बालरोग तज्ञांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता. पनवेल येथील हंडे हॉस्पिटल मधून डॉ. दिलीप नाईक तर वलप गावातील डॉ. राजेश वाघमारे यांनी मोठे योगदान दिले. एमजीएम हॉस्पिटल कामोठेमधून दोन फीजीसीयन व दोन स्त्री रोग तज्ञ नर्सिंग स्टाफ आला होता. या कॅम्पच्या माध्यमातून आदिवासी लोकांना त्यांच्या तपासणीनुसार लागणारे औषधेही मोफत वाटण्यात आली.
कफच्या अनेक सदस्यांनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन तपासणीसाठी येणार्या आदिवासी बांधव भगिनींना मोलाची मदत केली. जवळ-जवळ 120 आदिवासींनी या शिबिराचा लाभ घेतला. या पुढेही कफ या संस्थेसोबत अशा प्रकारच्या वेगवेगळ्या आरोग्य शिबिरांचे आयोजन करून फणसवाडी येथे चांगल्या प्रकारचे आरोग्य निर्माण करून देऊ असे शिबिराला आलेल्या डॉक्टरांनी सांगितले.