नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
आयपीएल 2021च्या 13व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा सहा गडी राखून पराभव केला. मागील मोसमातील अंतिम सामन्यांसह दिल्लीला सलग चार सामन्यांमध्ये मुंबईकडून पराभव पत्करावा लागला होता, परंतु दिल्लीने या मोसमात बरोबरी साधली. दिल्लीच्या विजयात अमित मिश्रा, शिखर धवन हे खेळाडू नायक ठरले. धवनने आपल्या 45 धावांच्या खेळीत अनेक विक्रम केले. यंदाच्या मोसमात ऑरेंज कॅप असणार्या धवनने सलामी फलंदाज म्हणून पाच हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज आहे. 160व्या डावात धवनने ही कामगिरी केली. गेल्या आयपीएलपासून धवन दिल्लीसाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी करतो आहे. या मोसमातही त्याने चांगली सुरुवात केली आहे. शिखर धवन आयपीएलमध्ये मुंबई, हैदराबाद, डेक्कन चार्जर्स आणि दिल्ली कॅपिटल्स अशा चार संघांकडून खेळला आहे. हैदराबादचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर या विक्रमात दुसर्या स्थानी आहे. त्याच्या खात्यात 124 डावांत 4692 धावा आहेत. तिसर्या स्थानी पंजाबचा फलंदाज ख्रिस गेल आहे. त्याने सलामीवीर म्हणून 122 सामन्यांत 4480 धावा केल्या आहेत.