नवी मुंबई मनपाचा पुढाकार; 38.795 टन निर्माल्य संकलित
नवी मुंबई ः बातमीदार
अत्यंत उत्साहात संपन्न झालेल्या श्री गणेशोत्सवामध्ये नवी मुंबईकरांनी पर्यावरणशील दृष्टिकोन जपत 15 हजारपेक्षा अधिक श्रीमूर्तींचे 134 कृत्रिम तलावात विसर्जन केले. त्याचप्रमाणे श्रीमूर्तींसोबत विसर्जनस्थळी आणले जाणारे निर्माल्य ओले व सुके अशा वेगवेगळ्या कलशातच टाकावे या महापालिकेने केलेल्या आवाहनालाही उत्तम प्रतिसाद दिला. श्री गणेशोत्सवातील पाच विसर्जन दिवसांमध्ये 22 नैसर्गिक व 134 कृत्रिम विसर्जन स्थळांवर ठेवलेल्या निर्माल्य कलशात 38.795 टन ओले निर्माल्य जमा झाले. हे निर्माल्य संकलित करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या वतीने 46 निर्माल्य वाहतूक वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. या निर्माल्यापासून महापालिकेतर्फे नैसर्गिक खत तयार करण्यात येत आहे. गणेशोत्सवात श्रीमूर्तींसोबत विसर्जनस्थळी येणार्या पुष्पमाळा, फुले, दुर्वा, तुळस, शमी, फळांच्या साली-तुकडे यासारखे पुनर्प्रक्रिया करण्यायोगे ओले निर्माल्य तसेच मूर्तीच्या गळ्यातील कंठी, सजावटीचे सामान असे सुके निर्माल्य ठेवण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वेगवेगळ्या निर्माल्य कलशांची व्यवस्था करण्यात आली होती. अशाप्रकारे ओले व सुके निर्माल्य वेगवेगळ्या कलशात ठेवण्याच्या संकल्पनेला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे यावर्षीच्या श्री गणेशोत्सव विसर्जन कालावधीत दीड दिवसाच्या विसर्जनाच्या दिवशी 6.070 टन, पाच दिवसाच्या विसर्जनाला 5.695 टन, गौरींसह सहाव्या दिवसांच्या विसर्जनाच्या वेळी 12.570 टन, सात दिवसांच्या विसर्जनाला 4.575 टन तसेच अनंत चतुदशीच्या विसर्जनाच्या वेळी 9.885 टन अशाप्रकारे पाच विसर्जन दिनी एकूण 38.795 टन निर्माल्य जमा झाले. या निर्माल्याच्या वाहतुकीसाठी 40 स्वतंत्र वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. हे निर्माल्य तुर्भे प्रकल्पस्थळी नेण्यात आले असून त्यावर शास्त्रोक्त खत निर्मिती प्रक्रिया केली जात आहे. अशाच प्रकारे अंकुर सामाजिक संस्था यांच्या वतीने चिंचोली तलाव, शिरवणे व करावे तलाव येथे तसेच नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने धारण तलाव, कोपरखैरणे येथे विसर्जन स्थळांवर निर्माल्यापासून खतनिर्मिती कार्यवाही करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे श्रीमूर्तींसोबत आणली जाणारी प्रसादरूपी फळे व खाद्यपदार्थ यांच्याकरीता वेगळे क्रेट विसर्जन स्थळी ठेवण्यात येऊन त्यांचे निराधार व गरजू नागरिकांना वितरण करण्यात आले.
नागरिकांचे मानले आभार
पर्यावरणशील दृष्टीकोन जपण्यात व त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात नवी मुंबईकर नागरिक नेहमीच पुढाकार घेताना दिसत असून यामुळे नवी मुंबईच्या पर्यावरणशील शहर नावलौकिकात सातत्याने वाढ होत असल्याचे सांगत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पर्यावरणप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांचे आभार मानले आहेत.