Breaking News

रोहितची किवी दौर्‍यातून माघार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
 न्यूझीलंड दौर्‍यात टी-20 मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवणार्‍या भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाने नुकताच पाच सामन्यांच्या मालिकेत 5-0 असा विजय मिळवत इतिहास घडवला होता. जागतिक क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाला आतापर्यंत पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील सर्व सामने जिंकता आले नव्हते, पण विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने हा पराक्रम करून दाखविला.
न्यूझीलंडविरुद्ध माउंट माउंगनुई येथील बेओव्हल मैदानावर झालेल्या पाचव्या टी-20 सामन्यात रोहित शर्माच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला फलंदाजी करताना मैदान सोडावे लागले होते. त्यानंतर तो क्षेत्ररक्षणासाठीदेखील आला नाही. त्याच्याऐवजी केएल राहुलने कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडली. आता रोहित शर्मा उर्वरित न्यूझीलंड दौर्‍याला मुकणार आहे. बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या वन डे आणि त्यानंतर होणार्‍या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठीही रोहित खेळणार नाही.
न्यूझीलंड दौर्‍याआधी जलद गोलंदाज इशांत शर्मा आणि सलामीवीर शिखर धवन हे दोन खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते. त्यानंतर आता रोहितला संघाबाहेर जावे लागत आहे. शिखरऐवजी वन डे संघात पृथ्वी शॉला संधी देण्यात आली होती. आता रोहितऐवजी कोणाली संधी मिळेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
पाच सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे रोहित शर्मा नेतृत्व करीत होता. रोहितने 41 चेंडूंत 3 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 60 धावा केल्या, पण दुखापतीमुळे तो क्षेत्ररक्षणासाठी आला नाही. या खेळीत रोहितने न्यूझीलंडविरुद्ध टी-20मधील अर्धशतक झळकावले. रोहितने टी-20मध्ये 25 वेळा 50हून अधिक धावा केल्या आहेत. या सामन्यात रोहित तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 50हून अधिक धावा करण्याबाबत रोहितने विराट कोहलीला मागे टाकले.
विराट कोहलीने टी-20 क्रिकेटमध्ये 24 वेळा 50हून अधिक धावा केल्या आहेत. न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिल आणि पॉल स्टर्लिंग यांनी प्रत्येकी 17 वेळा अशी कामगिरी केली, तर ऑस्ट्रेल्याच्या डेव्हिड वॉर्नरने 15 वेळा 50हून अधिक धावा केल्या आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply