पाली : प्रतिनिधी
पावसाळ्यात माळरान,
गडकिल्ले, जंगल भागात मोठ्या प्रमाणात छोटी झुडपे व गवत उगवते, मात्र ऑक्टोबरनंतर ही झाडीझुडपे व गवत सुकते आणि कळतब नकळत डोंगराला वणवा लागतो. रायगड जिल्ह्यात दरवर्षी हजारो हेक्टर क्षेत्रावर असे
वणवे लागतात. या वणव्यात झाडेझुडपे, पशुपक्षी, सूक्ष्म जीव तसेच सरपटणारे प्राणी यांचा जळून मृत्यू होतो. हे वणवे वनसंपदा नष्ट करीत आहेत. त्याचबरोबरच जिल्ह्यातील विविध ऐतिहासिक वास्तू आणि किल्ल्यांवरील वस्तूंनादेखील नुकसान पोहचवत आहेत. वणव्यात गवत जळाल्याने त्यावर अवलंबून असणार्या गुराढोरांवर उपासमारीची वेळ येते. सजीवसृष्टीचे नुकसान होते. या वणव्यांवर नियंत्रण आणणे अत्यंत गरजेचे आहे.
लोकांचा पुढाकार महत्त्वाचा
वणव्यांमुळे संपूर्ण सजीवसृष्टी धोक्यात येते. पर्यावरणाचा र्हास होतो. त्यामुळे वणवे रोखण्यासाठी वनविभागाच्या माध्यमातून विविध उपाय व जनजागृती केली जाते. तसेच विद्यार्थी पथनाट्ये सादर करतात, मात्र हे प्रयत्न अपुरे आहेत. या उपायांबरोबरच स्थानिक लोकांना व आदिवासींना वणव्याचे दुष्परिणाम सांगून त्यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. प्रामुख्याने वनविभाग, निसर्गप्रेमी व आदिवासी विद्यार्थ्यांच्या मदतीने जनजागृती करण्याची गरज आहे. लोकांनीदेखील स्वयंस्फूर्तीने वणवे रोखणे व स्वतः लावणार नाही यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.
सजीवसृष्टीला धोका वणव्यांमुळे सजीवसृष्टी धोक्यात येते. पर्यावरणाची प्रचंड हानी होते. प्रदूषण वाढते. येथील जैवविविधता संपुष्टात येते. सरटणारे जीव (घोरपड, साप, सरडे, विंचू आदी), कीटक, झाडेझुडपे आणि औषधी वनस्पती आगीमध्ये भस्मसात होतात. फुलपाखरांना त्यांचे अन्न मिळविता येत नाही.