कर्जत : बातमीदार
मध्य रेल्वेच्या नेरळ रेल्वेस्थानकातील विविध समस्यांबाबत नेरळ प्रवासी संघटना आक्रमक झाली होती, मात्र त्यांच्या अनेक मागण्या मध्य रेल्वे प्रशासनाने मान्य केल्या आहेत. दरम्यान, मागण्या मान्य झाल्यामुळे मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना काळे झेंडे दाखविणार नाही, असे प्रवासी संघटनेने जाहीर केले आहे.
नेरळ रेल्वेस्थानकातील विविध समस्यांबाबत नेरळ प्रवासी संघटना गेली काही वर्षे सतत पाठपुरावा करीत आहे. तरीही अनेक समस्या प्रलंबित आहेत. दरम्यान, शुक्रवारी (दि. 7) मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नेरळ रेल्वे स्थानकात पाहणी आणि परीक्षण करण्यासाठी येणार असल्याचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यामुळे आपल्या मागण्या मान्य होणार नसतील तर महाव्यवस्थापकांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा नेरळ प्रवासी संघटनेने निवेदनाद्वारे दिला होता. त्यामुळे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी नेरळ येथे येऊन प्रवासी संघटनेच्या पदाधिकार्यांसोबत चर्चा केली होती.
त्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाच्या मुंबई विभागीय कार्यालयाने 29 जानेवारी रोजी नेरळ प्रवासी संघटनेला पत्र दिले असून त्यात नेरळ स्थानकातील दोन्ही फलाटांवर निवारा शेड, फलाट एकवर स्वच्छतागृह, नवीन पादचारी पूल, लिफ्ट आणि सरकता जिना उभारणे तसेच प्रवाशांसाठी 25 ठिकाणी नवीन बेंचेस आणि तिकीटघरापासून अन्य ठिकाणी एटीव्हीएम मशीन बसविणे आदी मागण्या मान्य करण्यात आल्याचे म्हटले आहे, तसेच तिसर्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर कर्जत-कल्याण शटल सेवेबाबत निर्णय घेतला जाईल, असे लेखी स्वरूपात कळविण्यात आले आहे.
‘मरे’चे सल्लागार समिती सदस्य शहा यांनी हे पत्र नेरळ प्रवासी संघटना अध्यक्ष संदीप म्हसकर, अन्य पदाधिकारी मिलिंद विरले, आबा पवार यांना सादर केले आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाने आमच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला आहे. काही कामे मार्गीदेखील लागताना दिसत आहेत. मुख्य म्हणजे सर्व मागण्यांवर लेखी निवेदन आणि आश्वासन देण्यात आल्याने आम्ही मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना काळे झेंडे दाखविण्याचा कार्यक्रम स्थगित करीत आहोत.
-संदीप म्हसकर, अध्यक्ष, नेरळ प्रवासी संघटना
नेरळ प्रवासी संघटना सातत्याने पाठपुरावा करीत असल्याने त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आपण प्रयत्न करीत होतो. नेरळ स्थानकाचा पुढील दोन वर्षांत कायापालट होईल, असे नियोजन मध्य रेल्वेने केले आहे.-केतन शहा, सदस्य, मध्य रेल्वे सल्लागार समिती
RamPrahar – The Panvel Daily Paper