महसुली दणक्यानंतर कर थकबाकी भरण्यास तयार

पाली : प्रतिनिधी
कर थकविल्यामुळे महसूल विभागाने मोबाईल कंपन्यांचे सुधागड तालुक्यातील 11 टॉवर सील केले होते. या दणक्याने जाग आलेल्या मोबाईल कंपन्यांनी सर्व कर भरण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे सील काढण्यात आले. सुधागड तालुक्यात वेगवेगळ्या मोबाईल कंपन्यांचे अनेक टॉवर असून, त्यापैकी काही कंपन्यांकडे एकूण पाच लाख 71 हजार 450 रूपयांची थकबाकी होती. या कंपन्याकडून कर थकबाकीची रक्कम भरण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत होती. त्यामुळे तहसिलदार दिलीप रायन्नावार यांनी शनिवारी (दि. 1) व सोमवारी (दि. 3) सुधागड तालुक्यातील 11 मोबाईल टॉवर सील केले होते. मात्र या मोबाईल कंपन्यांनी सर्व कर भरण्याचे आश्वासन दिल्याने महसूल विभागाने मंगळवारी त्या सर्व मोबाईल टॉवर सील काढले.
सुधागड तालुक्यातील 11 मोबाईल टॉवरची एकूण पाच लाख 71 हजार 450 रूपयांची थकबाकी होती. त्या सर्व टॉवर्सना सील ठोकण्यात आले होते. संबंधीत कंपन्यांनी ताबडतोब त्यांचा थकीत कर आमच्याकडे जमा करण्याचे कबूल केले आहे. त्यानंतर मोबाईल टॉवरचे सील काढले आहे.
-दिलीप रायन्नावार, तहसीलदार, पाली-सुधागड