पनवेल : प्रतिनिधी
स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2020मध्ये स्वच्छताविषयक उपक्रम लोकाभिमुख होण्याकरिता पनवेल महापालिकेतर्फे स्वच्छता स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, या स्पर्धेची घोषणा शुक्रवारी (दि. 28) करण्यात आली. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त संध्या बावनकुळे , सहाय्यक आयुक्त चंद्रशेकर खामकर, इन्फिनिटी फाऊंडेशन अध्यक्ष आयुफ आकुला उपस्थित होते.
या उपक्रमाअंतर्गत गृहनिर्माण संस्था, शाळा, हॉटेल, हॉस्पिटल, शासकीय कार्यालय, मार्केट असोसिएशन अशी विविध विभागांत स्पर्धा घेण्यात येणार असून, हा उपक्रम राबविण्याचे काम इन्फिनिटी फाऊंडेशन करणार आहे. पनवेल महापालिका हद्दीत 300 स्वंसेवक गृहनिर्माण सोसायट्यांत जाऊन नागरिकांना कचरा व्यवस्थापनाचे प्रशिक्षण आणि माहिती देणार आहेत. या माध्यमातून कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेचा संदेश देण्यात येईल. स्वच्छता स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणार्या संस्थांना 30 जूनपर्यंत संबंधित विभाग कार्यालयात अर्ज करता येणार आहे. स्पर्धेचे प्रत्यक्ष स्थळ परीक्षण व गुणांकन दर तीन महिन्यांनी होईल आणि त्या अनुषंगाने निकाल जाहीर केला जाणार आहे.
श्रेणी पहिले बक्षीस दुसरे बक्षीस तिसरे बक्षीस उत्तेजनार्थ
स्वच्छ गृहनिर्माण संस्था 5000 रु. 3000 रु. 2000 रु. 1000 रु.
स्वच्छ शाळा 5000 रु. 3000 रु. 2000 रु. 1000 रु.
स्वच्छ हॉटेल 5000 रु. 3000 रु. 2000 रु. 1000 रु.
स्वच्छ हॉस्पिटल 5000 रु. 3000 रु. 2000 रु. 1000 रु.
स्वच्छ शासकीय कार्यालय 5000 रु. 3000 रु. 2000 रु. 1000 रु.
स्वच्छ मार्केट असोसिएशन 5000 रु. 3000 रु. 2000 रु. 1000 रु.