स्थानिक प्रवासी संघटनेचे प्रशासनाला निवेदन
कर्जत : बातमीदार
मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील भिवपुरी रोड हे सध्या महत्वाचे स्थानक बनले आहे. या स्थानकातील समस्यांबाबत तेथील रेल्वे प्रवासी संघटनेने मुंबईत जाऊन मध्य रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले आहे. भिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघटनेच्या प्रतिनिधींनी नुकताच मध्य रेल्वेचे मुंबई विभागीय महाव्यवस्थापक गोयल यांची नुकताच मुंबईत भेट घेतली. यावेळी त्यांनी भिवपुरी रोड रेल्वे स्थानकातील पादचारी पूलामुळे निर्माण झालेल्या समस्या आणि या स्थानक परिसरातील नाला अरूंद केल्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांबाबतच्या समस्या मांडल्या. या वेळी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष किशोर गायकवाड, कार्याध्यक्ष गणेश मते, उपाध्यक्ष भरत कांबरी, राजेश विरले, सचिव विनोद बार्नेकर, खजिनदार महेश कडव आणि काही कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात कर्जत दिशेकडे उभारण्यात आलेल्या पादचारी पुलावरून दोन्ही दिशेला जाण्यासाठी रस्ते बनवले आहेत, मात्र ते दोन्ही रस्ते अर्धवट आहेत. त्यातील बार्डी गावाकडे जाणारा रस्ता जिल्हा परिषदेच्या रस्त्याला जोडला जावा. तसेच पश्चिम दिशेकडील डिकसळ गावाकडे असलेल्या रस्त्याचा भाग डायमंड रेसिडेन्सीपर्यंत जोडला जावा अशी मागणी प्रवासी संघटनेने केली आहे. त्याच भागात डिकसळ गावातील पाणी वाहून नेणारी पाईप मोरी होती, ती पाईप मोरी तेथील बांधकाम व्यावसायिकाने कमी रुंदीचा नाला बांधून अरूंद केली आहे. त्यामुळे पावसाळ्यात दोन तास सलग पाऊस सुरु राहिल्यास तेथील रेल्वे मार्गात पाणी साचून त्याचा परिणाम वाहतुकीवर होतो. तेथे मोठ्या आकाराची पाईप मोरी टाकण्यात यावी, अशी मागणी या वेळी प्रवासी संघटनेने केली. आणि तसे निवेेदनही मध्य रेल्वेचे मुंबई विभागीय महाव्यवस्थापक गोयल यांना दिले.