नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
कचराकुंडीमुक्त शहर असे नामाभिधान मिरविणार्या नवी मुंबईत काही ठिकाणी फिरत्या कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी कचरा टाकला जात होता, त्या ठिकाणी या कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत काही सदस्यांनी स्वच्छता मोहिमेबाबत प्रश्न उपस्थित केले होते. आधी ज्या ठिकाणी कचराकुंड्या ठेवण्यात आल्या होत्या, त्या नंतर काढून टाकण्यात आल्या होत्या. त्या जागी कचरा टाकला जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अशा ठिकाणी पालिकेने सुरक्षारक्षक नेमले होते. आता स्वच्छता सर्वेक्षणात नवी मुंबईचे स्थान वरचे राखण्यासाठी कचर्याच्या ठिकाणी फिरत्या कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. स्वच्छतेतील वरील मानांकन मिळविण्याचा नवी मुंबई पालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या तिमाही मानांकनात नवी मुंबईला तिसरे स्थान प्राप्त झाले आहे.