नगरसेविका दर्शना भोईर यांची मागणी; आयुक्तांना निवेदन
पनवेल : रामप्रहर वृत्त
संपूर्ण भारताचे प्रेरणास्थान व तमाम युवकांचे ऊर्जास्त्रोत असलेले स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याची पनवेल शहरातील वडाळे तलावाशेजारी उभारणी करावी, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी मनपा आयुक्त गणेश देशमुख यांना दिले आहे. या निवेदनात नगरसेविका भोईर यांनी म्हटले आहे की, पनवेल महापालिकेची स्थापना नव्याने झालेली आहे. महापालिका क्षेत्रातील कोणत्याही भागामध्ये स्वामी विवेकानंद या महान युगपुरुषाचा पुतळा नाही. 23 जानेवारी 2020 रोजी विवेकानंदांची जयंती साजरी करण्यात आली, पण महापालिका क्षेत्रामध्ये कोठेही त्यांचा पुतळा नसल्याने विविध संघटना व संस्था खंत व्यक्त करीत आहेत. महापालिका क्षेत्रातील वडाळे तलावाच्या सुशोभीकरणाचे काम सध्या सुरू असून, या सुशोभीकरणाच्या कामादरम्यान तेथे विवेकानंदांचा पुतळा उभारण्यात यावा, जेणेकरून सर्व नागरिकांची तसेच संस्था व संघटनांची मागणी पूर्ण होईल. उपरोक्त जनभावना लक्षात घेता वडाळे तलावाच्या सुशोभीकरणच्या कामादरम्यान स्वामी विवेकानंदांचा पुतळा उभारण्याबाबत महापालिकेच्या संबंधित विभागास तातडीने आदेशित करावे, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी आयुक्तांकडे केली आहे.