भारत-न्यूझीलंड वन डे मालिका
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
भारत-न्यूझीलंड यांच्यातील वन डे मालिकेतील अखेरचा सामना मंगळवारी (दि. 11) खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंडने पहिले दोन सामने जिंकून ही मालिका आधीच खिशात घातली आहे. त्यामुळे हा सामना यजमानांसाठी औपचारिकताच आहे, तर टीम इंडियाला इभ्रत वाचवण्यासाठी विजय मिळवणे अनिवार्य आहे, पण यंदाच्या वर्षात वन डे क्रिकेट हे लक्ष्य नसल्याचे कोहलीने आधीच स्पष्ट केले आहे. यंदा टी-20 वर्ल्डकप आहे आणि आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाही आहे. त्यामुळे टी-20 व कसोटीवर लक्ष केंद्रित करण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे. त्यामुळे मंगळवारच्या सामन्यात टीम इंडिया काही प्रयोग करू शकते. आगामी कसोटी मालिकेचे महत्त्व लक्षात घेता कर्णधार विराट कोहली विश्रांती घेऊ शकतो.
न्यूझीलंडने पहिल्या वन डेत टीम इंडियाचे 348 धावांचे लक्ष्य चार विकेट्स राखून पार केले. रॉस टेलरच्या शतकी खेळीने किवींना मालिकेत आघाडी मिळवून दिली. दुसर्या सामन्यातही रॉस टेरलची बॅट तळपली. त्याला मार्टीन गुप्तीलचीही साथ लाभली. न्यूझीलंडच्या 273 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव 251 धावांवर गडगडला. किवींनी 22 धावांनी सामना जिंकून मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. त्यामुळे वन डे मालिकेतील अखेरच्या सामन्यात टीम इंडिया काही युवा चेहर्यांना संधी देऊ शकते.
पृथ्वी शॉ व मयांक अग्रवाल यांना संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. शिखर धवन व रोहित शर्मा यांनी दुखापतीमुळे माघार घेतल्याने पृथ्वी व मयांक यांना संधी मिळाली, पण दोघांना अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. तरीही तिसर्या सामन्यात हे दोघेही खेळतील, परंतु सलामीला मयांकच्या जागी लोकेश राहुल येऊ शकतो. मयांकला तिसर्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. कर्णधार विराट कोहली या सामन्यात विश्रांती घेऊ शकतो. आगामी कसोटी मालिका डोळ्यांसमोर ठेवून कोहलीने विश्रांती घेणे महत्त्वाचे आहे, पण संघात कुणीच अनुभवी खेळाडू नसल्याने कोहलीच्या विश्रांतीवर संभ्रम आहे.