Breaking News

इंदुरीकर महाराजांनी ‘ते’ विधान करायला नको होते -भाजप

मुंबई : प्रतिनिधी : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर  यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्यात नवा वाद उफाळून आला आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून या वक्तव्यावरून वेगवेगळे मते मांडली जात आहे. राजकीय नेत्यांसह अनेकांनी इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याचा निषेध केला, तर अनेकांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. या सगळ्या वादविवाद भाजपानंही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. इंदुरीकर महाराजांची कीर्तने जनप्रबोधनासाठी असतात, मात्र इंदुरीकरांनी ‘ते’ विधान करायला नको होते, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

ओझर येथे झालेल्या कीर्तनात सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असे इंदुरीकर महाराजांनी म्हटले होते. हे वक्तव्य गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात आहे, तसेच गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी) कायद्यानुसार कलम 22चे उल्लंघन असल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला होता. या प्रकरणी इंदुरीकर महाराजांवर कारवाई करण्याची मागणीही ‘अंनिस’ने केली आहे.

यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, इंदुरीकर महाराज कीर्तनांतून जनप्रबोधन करीत असतात, मात्र त्यांनी केलेले ते विधान चुकीचेच आहे, जे त्यांनी करायला नको होते. त्यांच्या वक्तव्याचे समर्थन करीत नाही, पण भाजप त्यांच्या पाठिंशी आहे. एका वाक्याने व्यक्ती खराब होत नाही. त्यामुळे या माणसाची तपश्चर्या घालवू नका, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.

वारकरी संप्रदाय शांतता प्रिय आहे. वादाच्या पार्श्वभूमीवर माझ्या समर्थनार्थ मोर्चे, रॅली काढू नका. जमावाने आंदोलन करू नये. गावागावात निषेध सभा घेऊ नका. चलो नगर.. या सोशल मीडियावरून फिरणार्‍या पोस्टला प्रतिउत्तर देऊ नका. -निवृत्ती महाराज इंदुरीकर

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply