काँग्रेसने तर सारेच ताळतंत्र सोडले असल्याने त्यांच्याकडून दिल्लीकरांचीही वेगळी अपेक्षा नसावी. काँग्रेसच्या याच नकारात्मक वृत्तीमुळे दिल्लीने त्यांना सलग दुसर्यांदा सपशेल नाकारले हे तर निवडणुकीत दिसलेच. ही वेळ चिखलफेकीची किंवा राजकारण खेळण्याची नव्हे तर एकमेकांना सांभाळून घेणार्या एकजुटीची आहे हेच धुमसणारी दिल्ली सांगू पाहात आहे. जातीय दंगलींनी होरपळलेल्या राजधानी दिल्लीतील विद्वेषाचे निखारे अजून पुरते विझलेले नाहीत. गेल्या रविवारपासून अचानक ज्वालामुखी फुटावा त्याप्रमाणे दिल्लीचा ईशान्य भाग पेटला. शेकडो वाहनांची जाळपोळ झाली. बंदुकांच्या फैरी झडल्या. खजुरीखास, चांदबाग, भोजपुरा, जाफराबाद आदी भागांमध्ये दंगलखोरांनी अक्षरश: थैमान घातले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्याच सुमारास भारतात आले होते व दिल्लीतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत त्यांच्या महत्त्वाच्या वाटाघाटी सुरू होत्या. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठी दिल्ली पोलिसांची बरीच मोठी कुमक तैनात होती. त्यामुळे ईशान्य दिल्लीतील दंगलखोरांचे फावले. अर्थात ही दंगल पूर्वनियोजितच होती याचे पुरावे आता पुढे येत आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भारतदौर्याचा मुहुर्त साधून दिल्ली पेटवायची असा ‘कुणाचा’ तरी इरादा होता. या दंगलीचा कर्ताधर्ता आणि खलनायक कोण यावर आता राजकारण पेटले आहे. तीन दिवस दिल्लीत राहून देखील गप्प राहिलेल्या काँग्रेस नेत्यांना बुधवारी अचानक कंठ फुटला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाच काँग्रेसने आरोपीच्या पिंजर्यात उभे केले. रविवारी दंगल पेटली तेव्हा अमित शहा काय करत होते असा सवाल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पत्रकार परिषदेत केला. हा सवालच अत्यंत हास्यास्पद आहे. कारण दिल्लीत दंगल पेटत होती तेव्हा केंद्रीय गृहमंत्री सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत चर्चा करीत होते हे सार्या जगाला माहीत होते. विशेष म्हणजे काँग्रेसचे नेते देखील या बैठकीला उपस्थित होते. दिल्ली पोलिसांचे नीतीधैर्य उंचावण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गृहमंत्री शहा आणि त्यांचे सहकारी अहोरात्र काम करत होते. दंगल शमवण्यासाठी यत्किंचितही प्रयत्न न करणार्या काँग्रेस नेतृत्वाने आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी सर्वप्रथम मैदानात उडी मारली ही बाब अतिशय निंदनीय आहे. दिल्ली जळत असताना काँग्रेस नेत्यांना राजकारण सुचते ही गोष्ट कुठल्याही सुजाण नागरिकाला पटणारी नाही. दिल्लीच्या दंगलीचे खलनायक शोधण्याची तपासमोहीम पोलिसांनी सुरू केली असून गुन्हेगार निश्चितच पकडले जातील. त्याप्रकारचे अनेक पुरावे व्हिडिओ फितींसकट हाती येऊ लागले आहेत. जुन्या दिल्लीतील आम आदमी पक्षाचे नगरसेवक ताहिर हुसेन यांच्या घराच्या गच्चीवर पेट्रोल बॉम्ब व अन्य शस्त्रसामग्रीचा साठा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर नगरसेवक ज्या वस्तीत राहतात, त्याच इलाख्यात किंवा भागात अंकित शर्मा नावाच्या इंटेलिजन्स ब्युरोच्या अधिकार्याची सोमवारी दगडांनी ठेचून हत्या करण्यात आली. या दुर्दैवी दंगलींमध्ये तब्बल 35 जणांची हत्या झाली असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. गुरू तेगबहाद्दूर इस्पितळ व अन्य ठिकाणी 200 च्या वर जखमी उपचार घेत आहेत. असंख्य घरे बेचिराख करण्यात आली आहेत. अशा परिस्थितीत दंगलग्रस्तांचे सांत्वन करणे किंवा त्यांच्या मदतीला धावणे ही खरी गरज आहे. परंतु पुढारी मंडळी मात्र एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यातच धन्यता मानत आहेत.
Check Also
विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्याबाबत कार्यवाही करावी
आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय …