पेण : प्रतिनिधी
पेण नगर परिषदेचा 2020-21 चा 54 कोटी तीन लाख 70 हजार 10 रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प शुक्रवारी (दि. 28) विशेष सभेत मंजूर करण्यात आला. या अर्थसंकल्पात मालमत्ताकर व पाणीपट्टीत कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या पेण नगर परिषदेच्या या विशेष सभेला उपनगराध्यक्ष वैशाली कडू, गटनेते अनिरुध्द पाटील, बांधकाम सभापती राजेश म्हात्रे, कर व शुल्क सभापती निवृत्ती पाटील, पाणीपुरवठा सभापती दर्शन बाफना, महिला व बालकल्याण सभापती तेजस्विनी नेने, मुख्याधिकारी अर्चना दिवे व सर्व नगरसेवक उपस्थित होते. या शिलकी अर्थसंकल्पात 2020-21 या वर्षात एकूण 54 कोटी तीन लाख 70 हजार 10 रूपयांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. तर अंदाजित खर्च 51 कोटी 27 लाख 41 हजार 70 रूपये एवढा दाखविण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात सामान्य प्रशासन व वसुली खात्यासाठी सात कोटी 89 लाख 35 हजार 70 रूपये, सार्वजनिक सुरक्षिततेसाठी दोन कोटी 74 लाख रूपये, आरोग्य व सुखसोयीसाठी 13 कोटी 96 लाख 95 हजार व शिक्षणासाठी 31 लाख 25 हजार अशा प्रामुख्याने तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. शहरात नविन रस्ते करणे शिर्षकाखाली एक कोटी रूपयांची स्वतंत्र तरतूद ठेवण्यात आली आहे. मच्छीमार्केट नुतनीकरणासाठी 40 लाख, एलईडी पथदिवे बसविण्यासाठी 30 लाख व नगरपालिकेचे सर्व अभिलेख जतन करण्यासाठी 20 लाख अशा तरतुदी या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत, अशी माहिती नगरपालिका प्रशासनातर्फे देण्यात आली.