Breaking News

पेण तालुक्यातील कालव्यांची दुरुस्ती करा

आमदार रविशेठ पाटील यांची विधानसभेत मागणी

पेण : प्रतिनिधी

तालुक्यातील हेटवणे धरणातून शेती सिंचनासाठी सोडण्यात येणारे पाणी नादुरुस्त कालव्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाया जात असून, या नादुरुस्त कालव्यांची दुरुस्ती करण्याची मागणी भाजप आमदार रविशेठ पाटील यांनी विधानसभेत केली. पेण तालुक्यातील हेटवणे धरणातील पाणी सिंचनासाठी सोडले जाते. मात्र नादुरुस्त कालव्यांमुळे लाखो लिटर पाणी वाया जाते. एकीकडे तालुक्यातील खारेपाट विभागात पाणीपुरवठा होत नाही, तर दुसरीकडे नादुरूस्त कालव्यामुळे लाखो लीटर पाणी वाया जात असल्याचे आमदार रविशेठ पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. पेण तालुक्यात उभारण्यात आलेल्या कालव्यांना दोन्ही बाजूला काँक्रीटकरण करण्यात आले नसल्यामुळे कालव्यातील पाणी मोठ्या प्रमाणात जमिनीत मुरते. त्यामुळे सिंचनासाठी हे पाणी पोहचत नाही, असे सांगून पेण तालुक्यातील नादुरुस्त कालव्यांची दुरुस्ती करून काँक्रीटकरण करण्याची मागणी आमदार पाटील यांनी या वेळी केली. त्यावर उत्तर देताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कालव्यांतून अंशतः पाणी गळती होत असल्याचे सभागृहात सांगितले. तसेच दुरुस्तीसाठी मातीकाम व अस्तरीकरण काम करण्यात येत असल्याचे सांगितले.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply