एका मालिकेतील पात्राच्या तोंडी असलेल्या संवादात मुंबईची भाषा कोणती याची चर्चा होण्याचे मुळातच काही कारण नाही. मालिकांनी रसिकांचे मनोरंजन साधता येईल ते साधावे. उगीचच राजकीय विषयांना निष्कारण वादाची फोडणी देऊन वातावरण ढवळून काढण्याची उठाठेव करू नये. हे तारतम्य सर्वच टीव्ही मालिकांनी ठेवावे हे इष्ट. भारतातील जवळपास शंभर कोटीहून अधिक लोकसंख्या टेलिव्हिजन बघते. या देशात साठ कोटीहून अधिक दूरचित्रवाणी संच आजवर विकले गेले आहेत. ही आकडेवारी अर्थातच ढोबळ आहे. तरीही ती छाती दडपविणारीच आहे. भारतासारख्या विकसनशील देशात टीव्ही किती घराघरात पोहोचला आहे याचा अंदाज येण्यासाठी ही आकडेवारी पुरेशी ठरावी. संध्याकाळ झाली की घराघरातून टीव्ही मालिकांच्या शीर्षक गीतांचे सूर उमटू लागतात. कुणी ‘माझ्या नवर्याची बायको’ पाहात असते, तर कुणी संभाजी महाराजांची प्रतीक्षा करत असते. कुणाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दर्शन घ्यायचे असते तर कुणाला ‘अग्गबाई सासुबाई’ म्हणावेसे वाटते. राधिका आणि बबड्या यांचे कारनामे पाहण्यासाठी महाराष्ट्रातील घरे उत्कंठा ताणून बसलेली असतात. अशा कितीतरी मालिका आणि त्यातील व्यक्तिरेखांची नावे घेता येतील. हिंदी, मराठी व अन्य भाषिक मिळून शेकडो मालिकांचे मायंदाळ पीक दररोज घेतले जाते. त्याच्यावरच भारतीयांच्या मनोरंजनाची भूक भागवली जाते. या मालिकांच्या अगडबंब व्यापारामध्ये एक मालिका प्रकर्षाने उल्लेख करावा अशी, ती म्हणजे ‘तारक मेहता का उलटा चष्मा’. गेले दशकभर तरी ही मालिका एका खाजगी वाहिनीवर सुरू आहे. आणि आबालवृद्ध ती चवीने बघतात. या मालिकेत काही प्रमाणात खट्याळपणा असला तरी सर्वसामान्यत: ती एक निखळ विनोदी मालिका म्हणून ओळखली जाते. या मालिकेमध्ये सासुसुनांची भीषण भांडणे नाहीत वा नात्यागोत्यांमधले कुटिल डावपेच नाहीत. ‘गोकुलधाम’ नावाच्या एका मध्यमवर्गीय सोसायटीत रहिवाशांमध्ये घडणार्या मजेदार घटनांची माळ म्हणजे ही मालिका. बर्यापैकी निरागस आणि निर्विष विनोद, भाबडा आदर्शवाद आणि सामान्य वकुबाचे मनोरंजन असा साधारण या मालिकेचा बाज आहे. त्यातील व्यक्तिरेखा एव्हाना घरोघरी पोहोचल्या आहेत. निरुपद्रवी वाटणार्या यातील व्यक्तिरेखा कधी कधी अत्यंत निर्बुद्ध वाटतात. पण तरी देखील या मूळ गुजराती मालिकेने रसिकांच्या मनात चांगलेच घर केले आहे. मालिकेत दाखवल्याप्रमाणे गोकुलधामची हाऊसिंग सोसायटी मुंबईच्या उपनगरातीलच एक सोसायटी आहे आणि विविध प्रांतातील अठरापगड बिर्हाडे येथे एकोप्याने राहतात. ख्यातनाम लेखक पु. ल. देशपांडे यांच्या सुप्रसिद्ध ‘बटाट्याच्या चाळी’त साठ बिर्हाडांची वस्ती होती. परंतु ती बव्हंशी मराठी होती. नुसतीच मराठी नव्हे तर गिरगाव छापाची अस्सल मुंबईकर बिर्हाडे होती. गोकुलधामची वस्ती मात्र त्यामानाने फारच कृत्रिम वाटते. या मालिकेच्या निर्विष विनोदाच्या आडून काही वेळा छुपा अजेंडा राबवला जातो. त्याने कुठल्याही मराठी माणसाच्या डोक्यात तिडिक जाणे स्वाभाविक म्हटले पाहिजे. मध्यंतरी याच मालिकेतून शाकाहारी असण्याचे फायदे सांगण्यात आले होते. वास्तविक शाकाहाराच्या आग्रहापोटी मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करण्याचा डाव रचला जात असल्याची चर्चा त्याच काळात सुरू होती. शाकाहार विरुद्ध मांसाहार या काहिशा वादग्रस्त विषयाला निष्कारण खतपाणी घालण्याचे उद्योग अशा काही मालिका करतात. तेव्हा समाजात नाराजीचा सूर उमटतो.
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …