नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
मंगळ ग्रहावर अंतराळ यान पाठवण्याची मोहीम यशस्वी केल्यानंतर आता इस्रोने शुक्र ग्रहावर यान पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्राशी संबंधित माहिती या यानाद्वारे घेतली जाईल. शुक्र हा पृथ्वीच्या जवळचा ग्रह आहे. पुढील 10 वर्षांत सात अंतराळ मोहिमा काढण्याचा इस्रोचा मानस आहे. त्यातील एक मोहीम शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. 2023 मध्ये ही मोहीम काढली जाण्याची शक्यता आहे. इस्रोच्या मंगळयान मोहिमेला मिळालेल्या यशानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
शुक्र ग्रहावरील वातावरण, शुक्र आणि पृथ्वी यांच्यातील साम्यस्थळे, विविध थर, वातावरण, सूर्याशी असणारा संबंध या सगळ्यांबाबत या मोहिमेत अभ्यास केला जाणार आहे. याबाबतचे वृत्त समजताच जगभरातील सुमारे 20 देशांनी या मोहिमेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
येत्या 10 वर्षांमध्ये इतरही अनेक मोहिमा आखून त्या यशस्वी करण्याचा निर्णय इस्रोने घेतला आहे. चांद्रयान-1च्या प्रक्षेपणानंतर चांद्रयान-2चे प्रक्षेपणही करण्यात येणार आहे.