पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदीश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे व आयुक्त गणेश देशमुख यांनी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी संयुक्तपणे पुढीलप्रमाणे जाहीर आवाहन केले आहे.
साबण व पाणी वापरून आपले हात स्वच्छ धुवा, शिंकताना व खोकताना आपल्या नाकावर व तोंडावर रूमाल धरा, सर्दी किंवा फ्लयू सदृश्य लक्षणे असलेल्या लोकांशी नजीकचा संपर्क टाळा, मांस आणि अंडी पुर्णपणे शिजवून व उकडून घ्या, जंगली अथवा पाळीव प्राण्यांशी निकटचा संपर्क टाळा, स्वत:चे आणि इतरांचे आजारी पडण्यापासुन संरक्षण करा, आपले हात स्वच्छ धुवा, खोकल्यावर अथवा शिंकल्यानंतर अथवा एखाद्या आजारी व्यक्तीची काळजी घेताना तसेच स्वयंपाक करण्यापूर्वी, तयार करताना आणि तयार केल्यानंतर जेवणापुर्वी, शौचानंतर किंवा प्राण्यांचा संभाळ केल्यानंतर आणि प्राण्यांची विष्ठा काढल्यानंतर आपले हात स्वच्छ धुवा.
लक्षणे आढळून आल्यास उपचारासाठी आपल्या जवळील शासकिय रुग्णालयाशी संपर्क साधावा. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91-11-23978046, राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26127394, टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 104 असा आहे. कस्तुरबा रुग्णालय, मुंबई (दूरध्वनी- 022-23027769) नायडू रुग्णालय, पुणे (दूरध्वनी -020-25506300)
करोना विषाणू संसर्गामध्ये खोकला, ताप, श्वासोच्छवासात अडथळा निर्माण होणे ही लक्षणे दिसून येतात. चीन व अन्य देशातुन परत आलेल्या नागरिकांमध्ये अथवा प्रवाशांमध्ये ही लक्षणे दिसून आल्यास राज्य नियंत्रण कक्षास त्वरीत कळवावे. अशा व्यक्तीच्या विलगीकरणाची व्यवस्था खालील रुग्णालयामध्ये करण्यात आली आहे. आजारांच्या निदानाची व्यवस्था राष्ट्रीय विषाणू संस्था (एनआयव्ही) पुणे येथे उपलब्ध आहे तथापी रुग्णाचा प्रयोगशाळा नमुना राज्य एकात्मिक रोग सर्वेक्षण (आयडीएसपी) कक्षांमार्फत पाठविण्यात येईल. अधिक माहितीसाठी पनवेल महानगरपालिका वैद्यकीय नोडल आधिकारी डॉ. पद्मिनी येलवे (8369375615) यांच्याशी संपर्क साधावा.