अलिबाग : प्रतिनिधी
येस बँकेवर आरबीआय निर्बंध लादल्याने काही सहकारी बँकांनाही याचा फटका बसला आहे, परंतु रायगड जिल्ह्यातील एकही पतसंस्थेचे पैसे येस बँकेत अडकलेले नाहीत, अशी माहिती रायगड जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून देण्यात आली.
ज्या आर्थिक संस्थांच्या ठेवी येस बँकेत आहेत त्या अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे सहकारी बँका व पतसंस्थांच्या ठेवींची माहिती शासनाने मागवली होती. यानुसार रायगड जिल्ह्यातील ठेवींसंदर्भातही माहिती मागविण्यात आली होती.
जिल्ह्यातील दि रेवदंडा को ऑपरेटिव्ह अर्बन बँकेचे 35 लाख रुपये येस बँकेत अडकले आहेत. इतर कोणत्याही बँकांचे, तसेच जिल्ह्यातील एकही पतसंस्थेचे पैसे या बँकेत अडकलेले नाहीत, असे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले.
पतसंस्थांच्या ठेवी सहकारी बँकांमध्ये ठेवल्या जातात. राष्ट्रीकृत बँकांमध्येदेखील ठेवी ठेवल्या जातात. खाजगी बँकेत पतसंस्थांच्या ठेवी ठेवण्यास परवानगी नाही. त्यामुळे येस बँकेत जिल्ह्यातील पतसंस्थांच्या ठेवी नव्हत्या, असे रायगड जिल्हा पतसंस्थांचा महासंघाचे अध्यक्ष अॅड. जे. टी. पाटील यांनी सांगितले.
रायगड जिल्हा पतसंस्थांचा महासंघाशी 150 पतसंस्था संलग्न आहेत. यापैकी कोणत्याही संस्थेचे पैसे येस बँकेत नाहीत. त्यामुळे ग्राहकांनी चिंता करण्याचे कारण नाही.
-अॅड. जे. टी. पाटील, अध्यक्ष, रायगड जिल्हा पतसंस्थांचा महासंघ