Breaking News

पनवेलमध्ये मास्क, सॅनिटायझरचा तुटवडा

पनवेल ः बातमीदार

कोरोना या संसर्गजन्य रोगापासून बचावासाठी पनवेल परिसरात मास्क, सॅनिटायझरचा वापर वाढू लागला आहे. त्यामुळे मेडिकलमध्ये मास्क, सॅनिटायझरचा तुटवडा जाणवत आहे. काही मेडिकलमध्ये त्यांची दुप्पट ते तिप्पट दराने विक्री केली जात असल्याचेही निदर्शनास आले आहे. करोनाबाधित रुग्ण मुंबई, पुणे, नागपूरसह महाराष्ट्रात आढळू लागल्याने पनवेलमधील नागरिकदेखील काळजी घेऊ लागले आहेत. प्रत्येक जण सतर्क होऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यातील शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना कोरोनासंदर्भात काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी वारंवार हात धुणे, आजारी असल्यास मास्क वापरणे, शिंकताना रुमालाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोरोनामुळे मेडिकलमध्ये मास्क, सॅनिटायझर घेणार्‍यांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली. अचानक वाढलेल्या मागणीमुळे दोन्ही गोष्टींचा तुटवडा निर्माण झाल्याचे दुकानदार सांगत आहेत. दुसरीकडे मास्क, सॅनिटायझरच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 20 रुपयांना मिळणारे मास्क 50 रुपयांना, तर एन 95 मास्क 200 ते 250 रुपयांना विकले जात आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना मास्क व सॅनिटायझर मिळणे दुरापास्त झाले आहे. मास्क मिळत नसल्याने नागरिकांना तोंडाला रुमाल बांधण्याचा एकच उपाय उरला आहे. कोरोना व्हायरसचा शिरकाव होऊ लागल्याने सतर्कता बाळगण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. गर्दीच्या ठिकाणी संसर्गजन्य रोगापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी अनेक प्रकारच्या मास्कचा वापर करताना लोक दिसून येत आहेत.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply