Breaking News

पीडित गतिमंद मुलीला न्याय देण्यासाठी रोहा पोलीस ठाण्यावर धडकला भाजपचा मोर्चा

रोहा : प्रतिनिधी
रोह्यातील अष्टमी येथे अल्पवयीन गतिमंद मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी रोहा भाजपतर्फे पोलीस ठाण्यावर शुक्रवारी (दि. 13) मोर्चा काढण्यात आला होता. पोलीस उपविभागीय अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांना मोर्चेकर्‍यांकडून निवेदन देण्यात आले. पीडितेला न्याय मिळेपर्यंत भाजप स्वस्थ बसणार नाही, असे भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष माधवी नाईक यांनी या वेळी स्पष्ट केले.
रोहे अष्टमी येथे वास्तव्यास असलेल्या गतिमंद मुलीवर 28 फेब्रुवारी रोजी नराधमाने बलात्कार केला होता. सुरुवातीला हे प्रकरण दाबले गेले होते. अखेर नागरिकांनी आवाज उठविल्यावर आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला. या घटनेचा निषेध करून आरोपीला कडक शिक्षा व्हावी यासाठी भाजपने शुक्रवारी मोर्चा काढला होता. या मोर्चात ‘नारी के सन्मान मे भाजप मैदान मे’ अशा आशयाचे फलक घेऊन महिला-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. राम मारुती चौकातून निघालेला हा मोर्चा बाजारपेठ, फिरोज टॉकीज  करीत पोलीस ठाण्यावर धडकला.
या वेळी भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष माधवी नाईक यांनी सांगितले की, रोह्यात घडलेली घटना निंदनीय आहे. ही घटना दाबण्याच्या प्रशासकीय पातळीवर झालेल्या प्रयत्नाचा मी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करते. रायगडच्या पालकमंत्र्यांच्या गावात या अशोभनीय घटनेच्या पार्श्वभूमीवर आम्हाला येऊन मोर्चा काढावा लागतो हे दुर्दैव आहे. पालकमंत्र्यांनी स्वतः स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून प्रशासनाला धारेवर धरायला हवे होते, मात्र तसे झाले नाही. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे या पीडित मुलीच्या घराशेजारी शंभर मीटरवर येऊन भूमिपूजन करून गेल्या, मात्र पीडितेची भेट घेण्याचे, तिच्या कुटुंबीयांना दिलासा देण्याचे सौजन्य त्यांनी दाखवले नाही, ही बाब अत्यंत खेदजनक असल्याचेही त्यांनी नमूद केले. पेणच्या नगराध्यक्ष व महिला मोर्चा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष प्रीतम पाटील यांनी, महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, रोह्यात झालेल्या घटनेत गतिमंद गरीब मुलीला बोलता येत नाही. तिला न्याय मिळेल का, असा सवाल करीत राज्यकर्ते वाटण्या करण्यात गुंग असून, त्यांचा धाक राहिला नसल्याचे सांगितले; तर भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी नराधमाला पाठीशी घालू नका, 376 अन्वये आरोपीवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली.
 या मोर्चात पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील, राजेश मापारा, प्रदेश कार्यकारिणी सदस्य संजय कोनकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग, तालुका अध्यक्ष सोपान जांभेकर, नरेश कोकरे, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष बबलू सय्यद, महिला जिल्हा उपाध्यक्ष मेघना ओक, संगीत फाटक, जयश्री भांड, आनंद लाड, श्रद्धा घाग, ज्योती सनील कुमार, शहर अध्यक्ष शैलेश रावकर, संजय लोटणकर, नवनीत डोलकर, उत्तम नाईक, वसंत शेडगे आदी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply