Breaking News

आक्रस्ताळी नेतृत्व

राज्यातील पक्षनेतृत्व आक्रमक आणि तरुण असावे या विचाराने काँग्रेस हायकमांडने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना जबाबदारीतून मुक्त केले आणि त्यांच्या जागी नाना पटोले यांची प्रतिष्ठापना केली. राज्यातील पक्षाची सूत्रे वाजतगाजत हाती घेतल्यानंतर नानासाहेबांनी गुरुवारी जी मुक्ताफळे उधळली ती पाहता या पक्षाचे यापुढेही काही खरे नाही असेच कोणालाही वाटेल. गेल्या सहा वर्षांमध्ये रसातळाला गेलेला काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात उभारी घेऊ शकेल याची शाश्वती निदान आज तरी वाटत नाही. शेतकरी आणि इंधन दरवाढीच्या प्रश्नी अमिताभ बच्चन किंवा अक्षयकुमार यांच्यासारखे बॉलिवुडचे महासितारे ट्विटरवर मौन बाळगतात. त्यांच्या चित्रपटांचे शूटिंग आम्ही बंद पाडू अशी सरळसरळ धमकी नाना पटोले यांनी दिली आहे. आता या वक्तव्यावर काय बोलावे? शब्दच खुंटले. महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाला आक्रमक नेतृत्व बहाल करण्याचा काँग्रेस हायकमांडचा निर्णय डोकेदुखीच ठरणार असे दिसते. दिल्लीच्या सरहद्दीवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन असो किंवा इंधन दरवाढीचा प्रश्न असो, प्रत्येक घडामोडीवर चित्रपट सितार्‍यांनी काही ना काही भाष्य करावे अशी काही राजकीय नेत्यांची अपेक्षा असते. समाजमाध्यमांवर काय भाष्य करावे, करावे की न करावे हा सर्वस्वी त्या-त्या व्यक्तीचा प्रश्न असतो. अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य घटनेने सर्वांनाच दिले आहे. काही दिवसांपूर्वी ग्रेटा थनबर्ग नावाच्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या पर्यावरणवादी कार्यकर्तीने किसान आंदोलनाला पाठिंबा दर्शवताना एक टूलकिट ट्विटरवरून प्रसारित केले होते. या टूलकिट प्रकरणी भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडत्व सर्वोच्च असल्याची टिप्पणी लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक तार्‍या-सितार्‍यांनी केली होती. देशाच्या सार्वभौमत्वाविषयी आपली कलावंत मंडळी एकदिलाने आणि एकमुखाने आवाज उठवतात हे आजवर अनेकदा दिसले आहे. त्याचा आपल्याला अभिमान वाटायला हवा, परंतु प्रत्येक गोष्टीत त्यांनी व्यक्त व्हायलाच हवे अशी अपेक्षा धरणे हास्यास्पद आहे. नाना पटोले यांनी नुसती तशी अपेक्षा व्यक्त केली असती तरी समजून घेण्याजोगे होते. पण चित्रिकरण बंद पाडण्याची त्यांनी दिलेली धमकी निषेधार्ह आहे. यातून काँग्रेसमधील नेत्यांची सरंजामशाही मानसिकताच दिसते. शेतकर्‍यांच्या आंदोलनाच्या चिघळलेल्या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करतच आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये गेल्या नऊ दिवसांत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. हीदेखील चिंता वाढवणारीच बाब आहे. या दरवाढीमुळे सामान्य मध्यमवर्गीय माणूस भरडला जातो हे कोणालाही नाकारता येणार नाही, परंतु ही वेळ कोणामुळे आली? या देशावर तब्बल सहा दशके सुखाने राज्य करून आपली पोटे भरणार्‍या काँग्रेस पक्षाने हा देश ऊर्जा क्षेत्रामध्ये स्वावलंबी व्हावा यासाठी प्रयत्नच केले नाहीत. आजही देशाला गरजेच्या 85 टक्के इंधन आयात करावे लागते ही दुर्दैवाची बाब आहे. सत्तेवर असताना काँग्रेसने इंधनवापराबाबतचे परावलंबित्व कमी करण्यासाठी काही पावले उचलली असती तर आज इंधन दरवाढीच्या या झळा बसल्या नसत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील तेल व नैसर्गिक वायू केंद्राचे उद्घाटन करताना नेमक्या याच वस्तुस्थितीवर बोट ठेवले, परंतु ते बहुदा पटोले यांच्या ऐकण्यात किंवा वाचण्यात आलेले दिसत नाही. चित्रपट सितारे ही सॉफ्ट टार्गेट असतात. त्यांच्यावरती तोंडसुख घेतले की भरपूर प्रसिद्धी मिळते. महाराष्ट्रातील नव्या काँग्रेस अध्यक्षांचा हेतू तोच असावा.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply