नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा : सिडको संचालक मंडळाच्या फेब्रुवारी 2020मध्ये पार पडलेल्या बैठकीत भूखंड वापर बदल व अतिरिक्त चटई क्षेत्र देण्याबाबतचे व्यापक धोरण ठरविण्यात आले असून त्यानुसार भाडेपट्टा अधिमूल्य आकारून विविध वापरासाठी दिलेल्या भूखंडांना अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक देण्यासह भूखंड वापर बदल करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.
नवी मुंबईसाठीचे विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोतर्फे नवी मुंबई जमीन विनियोग अधिनियम (सुधारित) 2008मधील तरतुदींनुसार विशिष्ट वापराकरिता व विशिष्ट चटई क्षेत्र निर्देशांक अनुज्ञेय करून भूखंड भाडेपट्ट्यावर देण्यात येतात. यापूर्वी सिडकोने विशिष्ट वापराकरिता देण्यात येणार्या भूखंडांकरिता वापर बदल व अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक देण्याबाबतचे धोरण आखले होते, तसेच शासनाच्या विविध निर्णयांनुसार माहिती तंत्रज्ञान/माहिती तंत्रज्ञान आधारित सेवा, शैक्षणिक, आरोग्य, धार्मिक, हॉटेल वापराकरिता देण्यात आलेल्या भूखंडांना अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक मंजूर करण्यात येत होता, परंतु भूखंड वापर बदल व अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक मंजूर करण्याबाबतची वाढती मागणी लक्षात घेता यासंदर्भात एक समग्र धोरण तयार करण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. हे लक्षात घेऊन सिडकोने भूखंड वापर बदल व अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक मंजूर करण्याबाबत नवीन व्यापक धोरण तयार केले आहे. या नवीन धोरणानुसार माहिती तंत्रज्ञान/माहिती तंत्रज्ञान आधारित सेवा, शैक्षणिक, आरोग्य, धार्मिक, हॉटेल वापराकरिता देण्यात आलेल्या भूखंडांना शासनाच्या प्रचलित नियमांनुसार अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक मंजूर करण्यात येईल, तसेच याव्यतिरिक्त अन्य भूखंडांच्या वापर बदलाकरिता सिडकोच्या राखीव किमतीवर आधारित साधी सोपी दररचना निश्चित करण्यात आली आहे. विविध प्रवर्गांतील भूखंडांच्या वापर बदलाकरिता अर्जदाराकडून अतिरिक्त अधिमूल्य आकारण्यात येणार आहे. भूखंड वापर व अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांकाबाबतच्या या नवीन धोरणाचा लाभ घेण्यासाठी भूखंडधारकांनी सिडकोच्या पोर्टलवर
ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.