Breaking News

धाटाव एमआयडीसीतील अन्शुल कंपनीत वायुगळती; 11 कामगार रुग्णालयात दाखल

रोहे ः प्रतिनिधी

रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक क्षेत्रातील मे. अन्शुल स्पेशालिटी मोल्युक्युल्स प्रा. लि. या कंपनीत रासायनिक अभिक्रिया चालू असताना पाइपलाइन फुटल्याने वायुगळती झाली. त्यामुळे तेथे काम करीत असलेल्या तीन कामगारांना वायूची तीव्र बाधा झाली. त्याचप्रमाणे कंपनीतील आणखी आठ जणांना त्रास झाल्याने त्यांनाही तातडीने रोहा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना सोमवारी (दि. 16) रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली.

वायुगळतीच्या घटनेमुळे धाटाव औद्योगिक परिसरात अनेकांना डोळे, नाक, घसा, तसेच श्वसनाचा त्रास झाला. घटना घडलेल्या कंपनीतील व एक्सेल कंपनीतील एक्सपर्ट टीमने वायुगळती आटोक्यात आणण्यात यश मिळवले, मात्र शेजारील गावांतील ग्रामस्थांनाही याचा जास्त त्रास जाणवला. प्राथमिक दक्षता कंपनीची गाडी फिरवत स्पीकर लावून या वेळी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. सुदैवाने काही वेळातच परिस्थितीवर नियंत्रण मिळवून परिस्थिती पूर्वपदावर आली. कंपनीत डिस्टिलेशनची प्रक्रिया सुरू होती. त्या वेळी पाइप लीकेज झाल्याने ही घटना घडली. सुरक्षा अधिकार्‍यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली, असे कंपनी व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply