पनवेल : प्रतिनिधी : पनवेल महापालिकेचा 2019चा सुधारित व 2020-21च्या अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी (दि. 17) झालेली स्थायी समितीची सभा पुन्हा एकदा स्थगित करण्यात आली. या वेळीही संबंधित अधिकारी अनुपस्थित असल्याचे दिसून आले.
स्थायी समितीसमोर 6 मार्चला सादर करण्यात आलेल्या महापालिकेच्या अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी 12 मार्च रोजी स्थायी समितीची सभा बोलावण्यात आली होती. त्या वेळी उपस्थित सदस्यांच्या सूचनांचा पाऊस पडल्याने इतर सदस्यांनादेखील सूचना करण्यास वेळ मिळावा या हेतूने 16 मार्च दुपारी 12 वाजेपर्यंत वेळ देण्यात आला होता, तसेच त्यावर चर्चा करण्यासाठी व अंदाजपत्रकाला स्थायी समितीची मंजुरी देण्यासाठी मंगळवारी स्थायी समितीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रवीण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस आरोग्य विभागाचे अधिकारी गणेश पोशेट्टी अलिबागला गेले असल्याने अनुपस्थित होते. त्यामुळे तो विषय नंतर घेण्याचे ठरले. देहरंग धरणाजवळ विश्रांतीगृहासाठी 50 लाख रुपयांची तरतूद या वेळी सुचविण्यात आली. सभागृह नेते परेश ठाकूर यांनी स्मार्ट गावांमध्ये वायफाय, सीसीटीव्हीसारख्या सुविधा देणे आवश्यक असल्याने त्यासाठी दोन कोटींची, पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी दोन कोटींची आणि महापौर चषक स्पर्धेसाठी एक कोटींची तरतूद करण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे बहुद्देशीय भवन या हेडखाली सगळी भवने घ्यावी, असा पर्याय सुचविला. नगरसेविका आरती नवघरे यांनी सिडको हद्दीतील रस्ते, गटारे यांची कामे लहान असल्याने सिडको ती कामे लगेच करीत नाहीत. त्यामुळे नगरसेवकांना नागरिकांना उत्तरे द्यावी लागतात. अशा कामांसाठी महापालिकेने तरतूद करण्याची मागणी केली, पण अशी कामे केल्यास ऑडिटमध्ये हरकत येईल, अशी माहिती देण्यात आली.