नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईत सोमवारी (दि. 15) कोरोनाचे 95 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नवी मुंबईत रुग्णांची संख्या तीन हजार 998 झाली आहे. दिवसभरात तीन जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या 121 झाली आहे. सोमवारी 66 जण बरे होऊन परतल्याने बरे झालेल्यांची एकूण संख्या दोन हजार 306 झाली आहे.
सलग तीन दिवस दीडशेची संख्या ओलांडल्यानंतर चिंता वाढली होती. पालिका कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी हरतर्हेने प्रयत्न करत आहे. त्यामुळे सोमवारी रुग्णांची संख्या घटल्याने ही काहीशी दिलासादायक बाब मानली जात आहे. सध्या नवी मुंबईतील पालिका तसेच विविध खासगी रुग्णालयांत सद्यस्थितीत एक हजार 571 रुग्ण उपचार घेत आहेत. सोमवारी बाधितांची विभागवार आकडेवारी पाहिल्यास बेलापूर 15, नेरुळ 7, वाशी 10, तुर्भे 8, कोपरखैरणे 26, घणसोली 13, ऐरोली 9, दिघा 7 असा विभागवार रुग्णांचा समावेश आहे. नवी मुंबईतील संख्या कमी होत असली तरी कोपरखैरणे विभाग मात्र हॉटस्पॉट बनत चालल्याने नागरिक चिंताग्रस्त आहेत. दाटीवाटीने वसलेल्या या भागात पावसाळ्यात काय होईल याची चिंता सतावू लागली आहे.