पनवेल : वार्ताहर
कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून शासकीय पातळीवर वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहे. त्याकरीता पोलिसांनीही पुढाकार घेतला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करीत असताना कोरोना रोगा विरोधात लढा देणार्या पनवेल शहर पोलिसांना रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने मास्कचे वाटप करण्यात आले. कोरोना हा महामारी रोग पनवेल परिसरातही येऊन ठेवला आहे. कॉस्मोपॉलिटन महानगर असलेल्या पनवेल सह आजूबाजूच्या वसाहतींमध्ये परदेशवारी करुन आलेल्या नागरिकांची संख्याही मोठी आहे. या भागात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. त्याच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याचबरोबर काही संशयित रुग्ण सुद्धा या भागात आहे. दरम्यान पनवेल महानगरपालिका, जिल्हा व तालुका प्रशासनाबरोबरच पोलिसांनीही कोरोना व्हायरसबाबत जनजागृती आणि प्रबोधन सुरु केले आहे. त्याचबरोबर अशाप्रकारचे रुग्ण शोधण्याकरीता पोलिसांची मदत घेतली जात आहे. परदेशवारी करुन आलेल्या नागरिकांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे. येथे पोलीस खडा पहारा देत आहेत. या कक्षातून पळ काढलेला नागरिकांचा शोध पोलिसांना घ्यावा लागत आहे. त्याचबरोबर पनवेल उपजिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणी करण्यासाठी शेकडो रुग्ण येत आहेत. या पार्श्वभूमीवर येथेही पोलिसांना विशेष लक्ष द्यावे लागत आहे. याव्यतिरिक्त जिल्हाधिकार्यांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी पोलीस करीत आहेत. याशिवाय मास्क, सॅनिटायझर चढ्या भावाने आणि बनावट पद्धतीने विक्रीच्या घटना घडत आहेत. एकंदरीतच कायदा आणि सुव्यवस्था, गुन्हे अन्वेषण हे काम करीत असताना पोलिसांना कोरोना या महामारी रोगा विरोधातही कर्तव्य बजावे लागत आहे. यामध्ये पनवेल शहर पोलीस आघाडीवर आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी, तायडे हे अधिकारी कोरोना विषयी जनजागृती आणि प्रबोधन करीत आहेत. तुम्ही घरीच थांबा आम्ही कर्तव्यावर आहोत असा संदेश देणारे पोलीस सुद्धा माणसच आहेत. त्यांनाही या महामारी रोगापासून संरक्षण आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने शहर पोलिसांना मास्कचे वाटप करण्यात आले. या वेळी रोटरीचे डॉ. लक्ष्मण आवटे, डॉ. आमोद दिवेकर, विवेक खाड्ये, संतोष घोर्डिदे उपस्थित होते.