कोरोनाचा संशयित किंवा कोरोनाबाधित व्यक्ती ही काही वाळीत टाकण्याजोगी नसते. अशा व्यक्तीची काही चूक देखील नसते. परंतु अशा व्यक्तींना जवळपास वाळीत टाकण्याच्या घटना गेल्या काही दिवसांत आढळून आल्या आहेत. तर कोरोनाविषयीच्या या सार्याभ्रामक समजुती तातडीने दूर करायला हव्यात. किंबहुना, या लढाईचे स्वरुपच ते आहे. डोळ्यांनी दिसत नसलेल्या शत्रूशी लढणे अतिशय कठीण असते.
युद्ध रणांगणावरच लढले जाते. परंतु सार्या जगाचेच जेव्हा रणांगणात रूपांतर होते तेव्हा बंद खोलीत बसून मोठ्या हिकमतीने डावपेच लढवतच शत्रूला नामोहरम करावे लागते. कोरोनाविरुद्धची लढाई भारताला अशाच प्रकारे लढावी लागणार आहे. जगातील तब्बल 188 देशांमध्ये या विषाणूने हातपाय पसरले आहेत. अमेरिका आणि इटलीसह युरोपातील अन्य बहुतेक सर्व देश अशा अनेक प्रगत देशांच्या आरोग्यव्यवस्थांनी या विषाणूसमोर जवळजवळ गुडघे टेकले आहेत. असे असताना अशा प्रकारच्या घातक साथ रोगाला तोंड कसे द्यायचे असते याचा वस्तुपाठ भारताने सार्या जगाला द्यावा अशी संधी आली आहे. थोडक्यात कोरोना विषाणू विरोधातील जागतिक महायुद्धाचे नेतृत्व आता भारताकडे आले आहे. कुठल्याही परिस्थितीत ही लढाई जिंकायचीच या जिद्दीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करून नेतृत्वाचे शिवधनुष्य उचलले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली भारतीय जनता हे युद्ध निर्णायकपणे जिंकेल याची खात्री आहे. परंतु या आधी कोरोना विषाणूसंदर्भात समाजात पसरलेले समज आणि गैरसमज यांचे निराकरण करणे आवश्यक आहे. पंतप्रधान मोदी यांनी देशातील 130 कोटी लोकसंख्येला एकप्रकारे आपली फौज मानले आहे. परंतु डोळ्यांना न दिसणार्या शत्रूशी आपल्याला लढावे लागणार आहे. तेव्हा आधी या शत्रूची माहिती आपल्याला असायला हवी याचे भान फौजेने ठेवणे आवश्यक आहे. पंतप्रधान आणि राज्य सरकारने पुकारलेल्या लॉकडाऊनमध्ये नागरिक यथाशक्ती सहभाग घेताना दिसत आहेत. काही ठिकाणी पोलिसांना काठ्या चालवून लोकांना सक्तीने घरी बसवावे लागले. तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांनी तर प्रसंगी दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश द्यावे लागतील अशी भयावह घोषणा केली. लाठीमार करून किंवा गोळ्या चालवून काहीही लाभ होणार नाही हे तर उघड आहे. सर्वात आवश्यक आहे ते कोरोना साथीच्या बाबतीतले सामान्य ज्ञान. कोरोना हा कुठला तरी कीडा असून तो परदेश प्रवास करणार्याला चावतो. आपल्याला त्याचा काही त्रास नाही अशाप्रकारची भ्रामक समजूत श्रमिक वर्गामध्ये प्रकर्षाने दिसून येते. तोंडावर मास्क लावला की कोरोना दूर पळतो असेही अनेकांना वाटते. उच्च तापमानामध्ये कोरोनाचा विषाणू टिकत नाही असाही गैरसमज वैद्यकीय वर्तुळांमध्ये देखील काही काळ होता. परंतु कोरोनाचा विषाणू पन्नास ते पंचावन्न डिग्री तापमानात देखील टिकू शकतो असे आता आढळून आले आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून काही मध्यमवर्गीय रहिवासी सोसायट्यांमध्ये अतिशय चुकीच्या पद्धतीने काळजी घेण्यात आल्याचेही दिसते. कोरोनाला नामोहरम करण्यासाठी एकमेव शस्त्र आपल्या हाती आहे ते म्हणजे शांत चित्ताने घरात बसून संसर्गाची साखळी तोडणे. एवढे केले तर 21 दिवसांनंतर येणारी पहाट आरोग्याचा नवा सूर्य घेऊन उगवेल हे नक्की.