कर्जत : बातमीदार : कर्जत तालुक्यातील संचारबंदीच्या काळात नेरळ बाजारपेठ बंद असणार आहे, पण त्या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंसाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदानात बाजार भरला जाणार आहे. दरम्यान, नेरळमध्ये कोरोनाबाबत सोशल मीडियावर चुकीची माहिती देणार्या एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेरळ गावातील बाजारपेठेमध्ये 23 मार्च रोजी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता. दुसर्या दिवशीदेखील कलम 144 लागू असताना बाजारपेठेत गर्दी कोणाला जुमानत नव्हती. त्यात आता केंद्र सरकारने संचारबंदी जाहीर केली आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन काही नियोजन केले पाहिजे यासाठी पोलीस आणि नेरळ ग्रामपंचायत यांनी छत्रपती शिवाजी महाराज मैदानात बाजार भरविण्याचा निर्णय घेतला आहे. तेथे भाजीपाला, फळे, दूध यांची दुकाने लावण्याची व्यवस्था केली आहे. या मैदानात भाजीपाला दुकानदार एका बाजूला बसविले जाणार असून त्यांच्यासमोर खरेदी करणारे गिर्हाईक हे ठरावीक अंतर ठेवून रांग लावून उभे राहणार आहेत. तीच स्थिती दूध विक्रेते आणि फळ विक्रेते यांच्यासाठी जागा तयार करण्यात आली आहे. त्या वेळी फक्त नेरळ गावातील भाजीपाला, फळे आणि दूधविक्रेते हे तेथे व्यवसाय करणार आहेत. बाहेरचे भाजीपाला घेऊन येणारे हे दरपत्रकावरून भाजीपाला होलसेलमध्ये तेथे बसलेल्या भाजीपाला विक्रेते यांना देऊन घरी परत जातील. भाजीपाला, दूध आणि फळे ही जादा दराने विकली जाऊ नयेत यासाठी पोलीस आणि ग्रामपंचायत दरपत्रक मैदानात लावणार आहेत. त्याचदराने भाजीपाला,दूध, किराणा वस्तू आणि फळे यांची विक्री करण्याची बंधने घालण्यात येणार आहेत.नेरळ ग्रामपंचायतचे सरपंच रावजी शिंगवा आणि सर्व सदस्य, तसेच नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अविनाश पाटील यांनी मैदानात ग्रामपंचायत कर्मचार्यांच्याकडून भाजीपाला, दूध, फळे यांची दुकाने लावण्यासाठी मार्किंग करण्यात आले.
तिकडे नेरळ पोलीस ठाणे हद्दीत नेरळ गावातील शाळेचे सवंगडी या सोशल मीडिया ग्रुपवर कोरोनामुळे काही फरक पडत नाही, बिनधास्त फिरा, असा मजकूर व्हायरल झाला होता. देशात संचारबंदी लागू झाली असताना शाळेचे सवंगडी या ग्रुपवरून व्हायरल झालेले मेसेज पाहून नेरळ पोलीस आक्रमक झाले. पोलिसांनी कोरोनाबाबत चुकीचा मेसेज कोणी दिला होता याचा शोध घेतला. त्यात नेरळच्या ब्राह्मण आळी भागातील ऋषभनाथ अपार्टमेंटमध्ये राहणार्या कमलेश दिलीप कवाडकर या तरुणाने तो मेसेज व्हायरल केला असल्याचे स्पष्ट झाले. नेरळ पोलिसांनी त्या तरुणाला रात्री शोधून आणत त्याच्यावर चुकीची माहिती सोशल मीडियावर व्हायरल केल्याबद्दल गुन्हा दाखल केला. सध्या कोर्ट बंद असल्याने त्या तरुणाला कोर्टात हजर केले जात नाही तोवर दररोज नेरळ पोलीस ठाण्यात येऊन हजेरी लावण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी दिली. त्याचवेळी दुसरीकडे नेरळ बाजारपेठ बंद करण्याचा निर्णय झाल्याने त्या ठिकाणी परिसर निर्जंतुक करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीकडून सुरू आहे.