भाजपचे सुरज पाटील यांच्या प्रयत्नास यश
नवी मुंबई : प्रतिनिधी
सारसोले गावातील रहिवाशांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. त्यातच बर्याचदा दुर्गंधीयुक्त आणि दूषित पाणी येत असल्याने नागरिक संतप्त होते. याबाबत भाजपचे माजी नगरसेवक सुरज पाटील यांनी नेरूळ वॉर्ड कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा देताच मनपा प्रशासनाने तातडीने कारवाई करत पाणीपुरवठा सुरळीत केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
सारसोले परिसरातील साडेबारा टक्के प्लॉटमधील तसेच गावठाण मधील रहिवाशांना मागील मागील सहा महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. ऐन पावसाळ्यात दुर्गंधी युक्त आणि दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक संतप्त होते. याबाबत भाजपचे माजी नगरसेवक सूरज पाटील यांनी एप्रिलमध्ये मनपा प्रशासनास तक्रार करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती. हा प्रश्न जैसे थे असल्याने मागील आठवड्यात सुरज पाटील यांनी नेरूळ वॉर्ड कार्यालय गाठून याबाबत जाब विचारला होता. पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता.
यानंतर पाणीपुरवठा विभातील उपअभियंता संदेश भानुशाली, उपअभियंता सुरेश लखदिवे यांनी सारसोले गावात माजी नगरसेवक सुरज पाटील यांच्या सह पाहणी दौरा केला. दूषित पाण्याचे नमुने घेऊन ते प्रयोशाळेत पाठवले. ज्या भागात पाण्यास कमी दाब आहे तेथील जुन्या व गांजलेल्या पाईपलाईन बदलण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी कमी दाब आहे अशा ठिकाणी दाब वाढवण्याचा सूचना देण्यात आल्याने येथील रहिवाशांना आता सुरळीत आणि पुरेसा पाणीपुरवठा होत आहे.