Breaking News

ऑनलाइन शॉपिंग करताना नागरिकांनी खबरदारी घ्यावी

वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांचे आवाहन

पनवेल : वार्ताहर

आजच्या काळात आपण सर्वजण ऑनलाइन शॉपिंग करतो. अगदी मोठमोठ्या वस्तूंपासून, तर पेन-पेन्सिल यांसारख्या वस्तूसुद्धा आपण ऑनलाइन मागवतो, पण ऑनलाइन शॉपिंग करणे पूर्णपणे सुरक्षित आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. कधीकधी बर्‍याच आकर्षक ऑफर देऊन हे केले जाते, तर काही वेळा चुकीची ऑर्डर देऊन फसवणूक केली जाते. दर्शविलेल्या ऑफर बर्‍याच वेळा चुकीच्या असतात, त्यांचा मुख्य हेतू लोकांना फसविणे आहे. त्यामुळे नागरिकांनी ऑनलाइन शॉपिंग करताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांनी व्यक्त केले.

स्मिता जाधव पुढे म्हणाल्या की, कधी काळी गंमतीचा भाग असलेले नेट शॉपिंग आता गरज बनू पाहत आहे. दुकानात जाऊन निरखून-पारखून वस्तू घेण्याचा प्रकार मागे पडून, आता नेटवरच्या दर्शनावरच भरवसा ठेवून बिनदिक्कत मोठमोठे नेट-शॉपिंग केले जात आहे. लॉकडाऊननंतर ऑनलाइन शॉपिंगकडे लोकांचा कल वेगाने वाढला आहे. आपल्याला फक्त एका क्लिकवरून ऑर्डर केलेली वस्तू किंवा सामानाची घरी डिलिव्हरी मिळते. ऑनलाइन शॉपिंग करताना अनेक प्रकारचे पर्याय आणि ऑफरदेखील आपल्याला मिळतात, परंतु प्रत्येक गोष्टीचे काही फायदे आणि काही तोटे देखील असतात. म्हणूनच ऑनलाइन शॉपिंग करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

ऑनलाइन शॉपिंग करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालेली आहे. अशा परिस्थितीत, अनेक साइट आकर्षक ऑफर दर्शवून ग्राहकांना आकर्षित करतात. परंतु खरेदी नेहमीच एका विश्वसनीय साइटवरून केली जावी कारण बिलिंग दरम्यान घरातील पत्ता, मोबाइल नंबर, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड यासारखी सर्व माहिती द्यावी लागते. अशा परिस्थितीत, साइट सुरक्षित नसल्यास आपली वैयक्तिक माहिती लीक होऊ शकते. त्यामुळे प्रत्यक्ष दुकानात जाऊन निरखून व पारखून वस्तू घेणे नेहमीच सुरक्षित असल्याचे मत स्मिता जाधव यांनी व्यक्त केले.

सायबर गुन्ह्यांचे व ऑनलाइन शॉपिंगच्या वेबसाईटवर फसवणुकीचे प्रकार सर्रासपणे घडत असल्याने आपल्या मोबाईल वर आलेला ओटीपी कोणालाही शेअर करू नका, फोनवर बँक खात्याचा एटीएमचा पासवर्ड, तसेच फोनपे, गुगलपे, पेटीएम इत्यादी प्रकारच्या ऑनलाइन ट्रान्जेक्शनबाबतचा ओटीपी कोणालाही शेअर करू नका तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून खबरदारी घेण्याचे आवाहनही स्मिता जाधव यांनी केले आहे.

‘स्वदेशी वस्तूंना प्राधान्य द्या’

लॉकडाऊन काळात बाहेर पडता येत नसल्याने ऑनलाइन शॉपिंगकडे कल वाढला होता, परंतु ऑनलाइन शॉपिंग व प्रत्यक्षात एखाद्या ठिकाणी जाऊन केलेली शॉपिंग यात प्रचंड फरक आहे. ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणुकीचे प्रकार घडतात. त्यामुळे थेट दुकानात जाऊन केलेल्या खरेदीमुळे शक्यतो फसवणूक होत नाही. परदेशी कंपन्यांच्या ऑनलाइन भूलथापांना बळी न पडता समक्ष दुकानात जाऊन व स्वदेशी वस्तूंना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे असल्याचे मत स्मिता जाधव यांनी व्यक्त केले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply