Breaking News

समतोल राखणे इष्ट

समाजमाध्यमांवरही लोक एकमेकांना गांभीर्य तसेच सकारात्मकता राखण्याचे सल्ले देत आहेत. एकंदरच कोरोनासंदर्भातील परिस्थितीचे नेमके स्वरूप स्पष्ट होण्यास आणखी दोन आठवडे जावे लागणार असल्याने तोवर सगळ्याच बाबतीत समतोल व सकारात्मकता राखणे इष्ट ठरणार आहे.

कोरोना विषाणूच्या फैलावामुळे देशात पसरत चाललेल्या घातक साथीचे स्वरूप आता हलकेहलके स्पष्ट होऊ लागले आहे व देशातील सर्वसामान्यांनाही आता लॉकडाऊनची आवश्यकता ध्यानात येऊ लागली असावी. यासंदर्भातील ताज्या घडामोडींवर नजर टाकल्यास हे अधिक स्पष्टपणे कळून चुकेल. एकीकडे जागतिक स्तरावर कोरोना विषाणूमुळे होणार्‍या कोविड-19च्या रुग्णांच्या संख्येत अमेरिकेसारख्या देशाने चीनला मागे टाकले आहे, तर ब्रिटनमध्ये तेथील राजघराण्याचे सदस्य प्रिन्स चार्ल्स यांच्या पाठोपाठ ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतातील रुग्णांची संख्या 700च्या वर पोहोचली असून महाराष्ट्रातील रुग्णसंख्या आज 147 झाल्याचे नोंदले गेले आहे. सांगलीत एकाच कुटुंबातील 12 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील या कुटुंबातील काही सदस्य नुकतेच हज यात्रेवरून परतले होते. त्यांना स्वतंत्ररीत्या ठेवण्यात आले होते, परंतु त्यापूर्वीच त्यांचा कुटुंबीयांशी संपर्क आला होता. टप्प्याटप्प्याने या कुटुंबातील एकंदर 12 जणांना लागण झाल्याचे समोर आले आहे. यापैकी एक महिला ही सांगलीतील अन्य गावातील आहे. हज यात्रेवरून परतलेल्या नातेवाइकांना भेटायला ती गेली होती. दुसरीकडे पंजाबमध्ये कोरोनाच्या संसर्गाने मरण पावलेल्या एका धर्मगुरूमुळे आणखी 23 जणांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मृत्यूपूर्वी या धर्मगुरूने 100च्या आसपास लोकांची भेट घेतली होती. तसेच बसने प्रवासही केला होता. लॉकडाऊनची खबरदारी किती आवश्यक आहे हे यातून चांगलेच स्पष्ट होते. मुंबई व आसपासच्या परिसरात प्रत्यक्ष वर्तमानपत्रे नसताना त्यांच्या वेबसाइट्स, अ‍ॅप्स, तसेच समाजमाध्यमांवरील बातम्यांमार्फत या घडामोडी लोकांपर्यंत अवश्य पोहोचायला हव्यात तरच या साथीच्या फैलावाचा अफाट वेग व परिस्थितीचे गांभीर्य जनतेच्या ध्यानात येईल. घरातील बंदिस्त जगण्याशी आता प्रौढ मंडळी तसेच लहान मुलेही जुळवून घेऊ लागली आहेत. पोलिसांनी घेतलेल्या काहिशा कठोर पवित्र्यामुळे बाहेर पडताना लोक निश्चितपणे ते खरोखरंच आवश्यक आहे का याचा विचार करीत आहेत. दुसरीकडे अन्नधान्य, भाजीपाला व दैनंदिन गरजेच्या वस्तूंची उपलब्धता कमी झाल्याचेही स्पष्ट होऊ लागले आहे. गल्लीबोळातील छोट्या दुकानदारांकडेच नव्हे तर देशभर जाळे असलेल्या बिग बास्केटसारख्या बड्या, नावाजलेल्या ऑनलाइन शॉपिंग मंचावरही कित्येक वस्तूंचा पुरेसा साठा नाही. मॉलमधून दुकाने थाटलेल्या एका बड्या डिपार्टमेंटल स्टोअरने लॉकडॉऊनच्या काळात आपण अन्नधान्य व अन्य खाद्यपदार्थ घरपोच करू, असे संदेश चार दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर प्रसृत केले होते, परंतु आता मात्र त्यांच्याकडे येणारी मागणी प्रचंड वाढल्यामुळे लोकांनीच येऊन सामग्री घ्यावी, असे त्यांच्याकडून सांगितले जात आहे. अन्नधान्य व खाद्यसामग्रीची उपलब्धता अशा तर्‍हेने कमी झाल्यास लोकांना घरातच थोपवून ठेवणे आणखी जिकिरीचे होईल. एकीकडे परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जनतेने सामग्रीचा वापर जपून करावा, असे आवाहन काही सुजाण लोक करीत आहेत, तर काही लोकांना ही अवघी परिस्थिती लवकरच आटोक्यात येईल, असा आशावादही वाटत आहे.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply