गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांचे प्रयत्न
माणगाव ः प्रतिनिधी – कोरोनाची वाढती दहशत विचारात घेता माणगावमधील सर्व दुकानदार, नगरपंचायत, विविध सामाजिक संस्था, संघटनांचे प्रमुख पदाधिकारी यांनी बैठक घेऊन माणगाव सलग तीन दिवस बंद ठेवण्याचा स्वयंस्फूर्तीने निर्णय घेतला होता. या निर्णयाला माणगावकरांनी चांगला प्रतिसाद दिला, मात्र रविवारी (दि. 5) पुन्हा सकाळी 8 ते 12 या वेळेत अत्यावश्यक असलेली जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू झाल्यावर माणगाव बाजारपेठेत गर्दी झाली होती. माणगावला जणू काही जत्रेचे स्वरूप आले होते. माणगावमधील गर्दी कमी करण्यासाठी सरकारच्या सूचनेनुसार माणगाव नगरपंचायत व पोलीस प्रशासन वेगवेगळ्या युक्त्या लढवून पुरेपूर प्रयत्न करीत आहेत. तरी माणगावमधील गर्दीची चिंता वाढतच आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे.
कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी माणगावकरांनी प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावे. बाजारपेठेत खरेदी करताना गर्दी करू नये, अन्यथा मोठे संकट आपल्यावर ओढवेल याची दक्षता सर्वांनी बाळगावी, अशी विनंती माणगाव नगराध्यक्षा योगिता चव्हाण, माजी नगराध्यक्ष आनंदशेठ यादव, उपनगराध्यक्ष दिलीप जाधव, स्वच्छता व आरोग्य समिती सभापती रत्नाकर उभारे, विषय समित्यांचे सर्व सभापती तसेच नगरसेवक, नगरसेविका यांनी नागरिकांना केले आहे.