कर्जत : बातमीदार
कोरोनामुळे टाळेबंदी व संचारबंदी असताना नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मटण आणि चिकनची दुकाने उघडण्यास शासनाने परवानगी दिली आहे, मात्र नेरळमध्ये मटण विक्रेत्यांनी चढे दर लावून ग्राहकांची लूट सुरू केली होती. त्यावर तोडगा निघाल्यानंतर आता एका विक्रेत्याने ग्राहकाशी वाद घालून त्याला धमकी दिल्याची घटना रविवारी (दि. 5) घडली. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
नेरळमध्ये मटण विक्रेत्यांनी काही दिवसांपूर्वी 700 रुपये आणि त्याहून अधिक भाव एक किलोसाठी लावला होता. त्यामुळे ग्राहकांनी होणार्या फसवणुकीविरोधात आवाज उठवल्याने त्या वेळी नेरळ पोलिसांनी 480 रुपये किलो दराने मटण आणि 120 दराने चिकन विकण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आठ दिवस नेरळ येथील आणि कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या मटण विक्रेत्यांनी दुकाने उघडली नव्हती. शनिवारी सर्व मटण विक्रेते नेरळ पोलीस ठाण्यात पोहोचले आणि शेवटी 550 रुपये किलो दराने मटण विकण्यावर सन्मानजनक तोडगा निघाला. रविवारी मटण विक्रेत्यांनी आपली दुकाने उघडली, मात्र काही विक्रेते ताठर भूमिकेत दिसले.
नेरळ बाजारपेठ भागातील माथेरान रस्त्यावर असलेल्या हुसेन बोंद्रे नावाच्या एका मटण विक्रेत्याने तेथे आलेले ग्राहक सुभाष गोविंद पोतदार यांच्याशी चरबी देण्यावरून हुज्जत घातली आणि इथेच कापून टाकेल अशी धमकी दिली, तसेच हा मटण व्यवसायिक पोतदार यांच्या अंगावर धावूनदेखील गेला. या प्रकाराने घाबरलेल्या पोतदार यांनी नेरळ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. याप्रकरणी हवालदार मुनेश्वर अधिक तपास करीत आहेत.