नैराश्यातून बोटी ओढल्या किनारी; शासन मदतीची अपेक्षा
मुरूड ः प्रतिनिधी
मागील वर्षी पावसाळ्यात रायगड किनारपट्टीवर तुफान, फयान वादळ, महावादळ आणि विविध कारणांमुळे येणारी मासेमारीवरील बंदी अशा संकटामुळे रायगडचा कोळी समाज मासेमारी दुष्काळात पार होरपळून निघाला. त्यातून सावरत असतानाच कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचे नवे संकट कोळी बांधवांसमोर उभे राहिले आहे. त्यामुळे मुरूड तालुक्यातील मच्छीमार समाजाचा अतिशय वाईट संकटातून प्रवास सुरू आहे. मासेमारीसाठी बंदी, मुंबईची बाजारपेठ बंद, बोटीत असलेल्या मालालादेखील उठाव नाही, कवडीमोल भावात विकावा लागणारा माल, बोटीचा डिझेल खर्चही सुटत नाही, अशा अनेक संकटांना कंटाळून मुरूडच्या मच्छीमार कोळी बांधवांनी आपल्या बोटी किनार्यावर ओढल्या आहेत. देशातील लॉकडाऊन व संचारबंदीमुळे शेतीमालासोबतच मासेमार व्यावसायिकांनाही बाजारपेठ उपलब्ध नाही. मुरूडचा मासेमारी करणारा समाज दरवर्षी एप्रिल-मेमध्ये मासळी सुकवण्याचे काम मोठ्या प्रमाणात करतो. कारण दिवाळीमध्ये पर्यटकांकडून सुक्या मासळीची मागणी वाढते, पण यंदा एप्रिल-मेमध्ये मासळीच नसल्याने दिवाळीचा हंगामदेखील फुकट गेला आहे. अशी सर्व संकटे एका पाठोपाठ आल्याने मच्छीमार कोळी बांधवांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, मुरूड तालुक्यातील समुद्रकिनार्यांवर अनोळखी बोटी दिसल्यास हे कोळी बांधव तातडीने पोलिसांशी संपर्क साधून सदर लोकांची तपासणी करण्यास भाग पडतात. अशा रायगडच्या मच्छीमार कोळी बांधवांसाठी सरकार कोणती पावले उचलणार याकडे कोळी बांधवांचे लक्ष लागले आहे.
देशात लॉकडाऊन व संचारबंदीमुळे आम्ही घराबाहेर पडत नाहीत, पण आम्हाला उपजीविकेचे दुसरे साधन नसल्याने सध्या आमच्यातील गरीब कोळी बांधव फार संकटात सापडले आहेत. सरकारने आम्हाला तातडीने मदत करावी.
-मनोहर मकू
मुरूडचा कोळी बांधव मासेमारीव्यतिरिक्त कोणतेही काम करीत नाही. घरातील सर्वच पुरुष बोटीवर मासेमारी करतात, तर महिला आणलेले मासे विकण्याचे काम करतात, पण संचारबंदीमुळे सर्वच काम बंद आहे. परिणामी थोड्याच दिवसांत उपासमारीची वेळ येणार असल्याने शासनाने घरटी तातडीचे अनुदान जाहीर करावे.
-प्रकाश सरपाटील