पनवेल : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्र शासनाची मराठी भाषा व साहित्याशी निगडित विविध महामंडळे कार्यरत आहेत, पण त्या मंडळांवर करोडो रुपयांचा खर्च होऊनही कोणतेही भरीव कार्य झालेले दिसत नाही, त्याचे कारण म्हणजे जवळच्या लोकांची ओळखीने झालेली निवड; त्यामुळे ही मंडळे निर्जीव बनत चालली आहेत, म्हणून ही निवड व अ.भा.म. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडही लोकशाही पद्ध्रतीनेच व्हायला हवी, असे उद्गार आठव्या राज्यस्तरीय शुभम मराठी बालकुमार, युवा व नवोदित साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष प्रा. अशोक शिरसाट यांनी काढले. नुकत्याच पनवेल येथे साजर्या झालेल्या राज्य स्तरीय शुभम साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदावरून बोलत होते. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री समीरा गुजर यांच्या हस्ते झाले. तत्पूर्वी ग्रंथदिंडी आयोजन करण्यात आले होते. या वेळी व्यासपीठावर सुप्रसिद्ध नाट्य व कथा लेखिका प्रा. दीपाली सोसे, प्रसिद्ध उद्योजक श्रीकांत चव्हाण, ‘एस. एस. सोसे जीवनगौरव पुरस्कार’ सन्मानार्थी, तसेच माजी राष्ट्रपती यांचे सचिव सेवानिवृत्त अधिकारी रवींद्र जाधव, कवी सतीश राऊत, समीरा गुजर व संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अशोक शिरसाठ उपस्थित होते. या वेळी मान्यवर साहित्यिक, लेखक, कवींचा सत्कार, गौरव, तसेच पुरस्कार प्रदान करण्यात आले. नवोदित कवयित्री गीता महल्ले-लवाळे यांच्या ‘आयुष्य… एक न उलगडलेलं कोडं’ या चित्रकाव्याचे प्रकाशन अभिनेत्री समीरा गुजर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर आनंदी गुरुकुल अॅक्टिंग अकॅडमीच्या विद्यार्थी बालकलाकार स्वराज सोसे, हर्षित सोनटक्के, अश्विनी उकर्डे, महेश राठोड, ओम गोसावी, अंकिता राठोड, समृद्धी खडसे, ॠषिकेश माहोरे, पीयूष कावळे, यश मांगुळकर, प्रेम नाचोने, यश महल्ले, आस्था चुंगडे, आरव लवाळे, अनिरुद्ध जळगावकर, वर्हाडी मायबोली हा कार्यक्रम करून सर्वांची मने जिंकली. पुढील सत्रात ज्येष्ठ अभ्यासक सुरेशराव राहेरकर, डॉ. अंकुश अग्रवाल यांनी परिसंवाद, तर कथाकथनमध्ये विनय मिरासे, संदीप बोडके व डॉ. प्रतिभा जाधव यांनी रंगत आणली. त्यानंतर झालेल्या कविसंमेलनामध्ये डॉ. पल्लवी परुळेकर-बनसोडे, गजलकार ए. के. शेख यांच्यासह अनेक कवींनी आपल्या कविता सादर करून रसिकांची मने जिंकली. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष आतिश सुरेश सोसे, उमेश राठोड, गोसावी गुरुजी, प्रशांत सोनटक्के, संदीप फासे, प्रवीण लवाळे, रवींद्र चुंगडे, प्रशांत मानकर आदींनी परिश्रम केले.