वाघिवली ग्रामस्थांचा मुख्यमंत्र्यांविरोधात संताप
पनवेल : वार्ताहर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आश्वासन देऊनही मागण्यांची पूर्तता न झाल्याने पनवेलजवळील वाघिवली ग्रामस्थांनी मंगळवारी (दि. 4) रस्त्यावर उतरून निदर्शने केली. या वेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड केल्याने प्रकल्पग्रस्तांनी राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त केला.
वाघिवली गावातील मच्छिमारांना योग्य पॅकेज द्यावे, तसेच घरांच्या मोबदल्यात तीनपट जागा देण्याची मागणी येथील ग्रामस्थांची आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आम्ही भेट घेतली होती. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी संबंधित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. याकरिता थोडा वेळ द्या, असेही मुख्यमंत्री ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाशी बोलताना म्हणाले होते, मात्र या मागण्या मान्य केल्या गेल्या नसल्याने आम्ही रस्त्यावर उतरून निदर्शन करीत असल्याचे अखिल भारतीय किसान सभेचे रायगड जिल्हा अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे यांनी या वेळी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे वाघिवली गावात अद्यापही ग्रामस्थांचे वास्तव्य असताना सिडकोच्या भरावाच्या कामाने येथील ग्रामस्थांचा रस्ता बंद होऊन ग्रामस्थांनी मोठी गैरसोय झाली आहे. त्यामुळे टाटा हाय पॉवरची कामे
आंदोलकांनी बंद पाडून मोर्चा काढला होता. घटनेची माहिती मिळताच एनआरआय पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. या वेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यात खडाजंगी झाली. दरम्यान, सिडकोच्या माध्यमातून मागण्या मान्य न केल्यास भविष्यात हे आंदोलन अधिक तीव्र करू, असा इशारा प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी दिला आहे.