Breaking News

मासळीची आवक घटल्याने कोळी समाज चिंतेत

मुरूड : प्रतिनिधी

मागील दोन महिन्यांपासून खोल समुद्रात मासळी मिळेनाशी झाली आहे. पाच-सहा दिवस वस्ती करूनही पुरेशी मासळी मिळत नसल्यामुळे रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य भागात मच्छीमारी होड्या किनार्‍याला साकारलेल्या दिसत आहेत.  मुरूड तालुक्यात 650 होड्या आहेत. त्यातील आगरदांडा, दिघी, मुरूड, राजपुरी आदी भागातील बहुतांशी होड्या किनार्‍यावर आहेत.

हवामानातील बदलामुळे समुद्रातील मासळी दूरवर निघून गेली आहे. मासळी मिळण्यासाठी पश्चिमेकडून पूर्वेकडे वारे वाहणे आवश्यक असते, परंतु सध्या वारे दक्षिणेकडून व उत्तरेकडे वाहत आहेत. त्यामुळे समुद्रातील मासळी दूरवर निघून गेली आहे. मागील दोन महिन्यांपासून मच्छीमारांना खोल समुद्रात जाऊनही पुरशी मासळी सापडत नाही. त्यामुळे कोळी समाज चिंताग्रस्त झाला आहे.

मुरूड हे पर्यटन स्थळ असून येथे शनिवार व रविवार पर्यटकांची मोठी गर्दी असते, परंतु येथील मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात मासळी येत नसल्याने खवय्ये पर्यटकांना खूप जास्त पैसे खर्च करून चविष्ट मासळी खरेदी करावी लागत आहे. मासळीचे भाव वधारल्याचा फटका स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे. सध्या मुरूडच्या मार्केटमध्ये लहान सुरमयी, पापलेट, रावस, बांगडा, कोळंबी हीच मासळी नजरेस पडत आहे. समुद्रात तुरळक प्रमाणात मासळी सापडत असल्याने, मासळीचे दर गगनाला भिडले आहेत.

समुद्रात मासळी कमी प्रमाणात मिळत आहे. जी काही थोडीफार मासळी मिळते, ती जास्त किमतीत आम्हा मासळी विक्रेत्यांना खरेदी करावी लागते. त्यामुळे ती बाजारातही महाग विकावी लागते. मासळीची आवक वाढत नाही, तोपर्यंत ग्राहकांना महाग मासळी खरेदी करावी लागणार आहे.

-कविता जगदीश मकू, मासळी विक्रेती, मुरूड

पावसाळा सुरू होण्यापूर्वी ज्या वेगाने वारे वाहतात तशीच परिस्थिती मागील दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ सुरू आहे. वेगाचे वारे वाहत असल्याने समुद्रात जाळी टाकताच येत नाही. जाळे टाकले तरी ते गुरफटले जाते. त्यामुळे मासळी मिळत नाही. त्याकडे लक्ष देऊन शासनाने कोकणातील मच्छीमारांना दिलासा द्यावा.

-मनोहर मकू, उपाध्यक्ष, सागरकन्या मच्छीमार सोसायटी, मुरूड

मुरूड मार्केटमधील मासळीचे दर

रावस मध्यम आकाराचा एक नग 500 रुपये, मोठी सुरमई 2000 रुपये, मोठी कोलंबी 700 रुपये किलो, पापलेट 8 नग (छोटी साइज) 1000 रुपये.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply