173.27 कोटींच्या प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठी अमृत योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या 173.27 कोटींच्या प्रकल्पाला राज्य शासनाची प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या योजनेचा मार्ग मोकळा झाला असून, लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. यानिमित्ताने आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे.
पनवेल शहर, नवीन पनवेल, कळंबोली आणि महापालिका हद्दीतील इतर ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा केला जातो, मात्र भोकरपाडा जलशुद्धिकरण केंद्र पनवेल-न्हावाशेवा
यादरम्यान टाकण्यात आलेल्या जलवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. त्यांना फुटीचे ग्रहण लागल्याने 40 टक्के पाण्याचा अपव्यय होतो. त्यामुळे मागणीप्रमाणे नागरी वसाहतींना पाणी मिळत नाही. या वाहिन्या बदलण्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता. या अनुषंगाने मंत्रालयात बैठकाही झाल्या. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांसह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
महापालिकेतील सत्ताधार्यांच्या अखंड पाठपुराव्यामुळे पाणीपुरवठा मंत्र्यांनी काम त्वरित मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. 1 नोव्हेंबर 2018 रोजी 408.78 कोटी रुपयांच्या योजनेला प्राधिकरणाने मंजुरी दिली होती. यामध्ये पनवेल महापालिकेची पाण्याची मागणी 100 एमएलडी इतकी आहे. याबदल्यात मनपाच्या हिश्श्याची रक्कम अमृत अभियानातून स्वीकारण्यास जीवन प्राधिकरणाच्या 143व्या सभेत मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार पनवेल महापालिकेने 173.27 कोटींचा आराखडा मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला होता. विशेष म्हणजे यास शासनाच्या उच्चाधिकार समितीकडून मान्यता प्राप्त झाली होती. त्याआधारे शासनाकडून पनवेल महापालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प अहवालास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. 12 फेब्रुवारी रोजी नगरविकास विभागाकडून सहसचिव पां. जो. जाधव यांनी याबाबतची सूचना प्रसिद्ध केली आहे. ही योजना पूर्णत्वास आल्यानंतर महापालिकेकरिता 100 एमएलडी पाणी आरक्षित राहणार आहे. त्यामुळे पनवेल परिसराला मागणीप्रमाणे पाणी मिळणार आहे.
शासकीय यंत्रणेचे नाव हिस्सा/अनुदान (कोटीमध्ये)
पनवेल महापालिका 173.27
केंद्र शासन 86.635
राज्य शासन 43.3175
एमजेपी 43.31.75
पनवेल शहरासाठी महत्त्वपूर्ण असलेली पाण्याची योजना विलंब झाल्याने आता मंजूर होणार नाही असे वाटत असताना ती योजना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आता मंजूर झाल्याबद्दल आम्हाला आनंद झाला आहे. सुधाकर शिंदे यांनी बुडवलेला निधी गणेश देशमुख यांनी पुन्हा खेचून आणल्याबद्दल त्यांचेही हार्दिक अभिनंदन!
-परेश ठाकूर, सभागृह नेतेे, पनवेल मनपा