Breaking News

मराठा आरक्षणासाठी 16 जूनपासून मोर्चा

संभाजीराजेंची किल्ले रायगडावरून घोषणा

महाड ः प्रतिनिधी
आतापर्यंत तुम्ही माझा संयम पाहिला, पण इथून पुढे मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. मराठा समाज आरक्षणासाठी येत्या 16 जूनला पहिला मोर्चा काढण्यात येईल, अशी घोषणा खासदार संभाजीराजे भोसले यांनी रविवारी (दि. 6) किल्ले रायगडावरून केली. ते शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यात बोलत होते.
6 जून अर्थात शिवराज्याभिषेक दिनापर्यंत मराठा आरक्षणाविषयी राज्य सरकारने ठोस भूमिका घेतली नाही तर आम्ही भूमिका जाहीर करू, असा इशारा खासदार संभाजीराजे भोसले यांनी दिला होता. त्यामुळे ते रायगडावरून काय भूमिका जाहीर करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. त्यानुसार रायगडावर झालेल्या शिवराज्याभिषेक दिनाच्या कार्यक्रमानंतर संभाजीराजेंनी सरकारला इशारा देत छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळापासून पहिला मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली.
संभाजीराजे म्हणाले, मला सांगायचंय की, सध्या तुम्ही रस्त्यावर येऊ नका. पहिली जबाबदारी आमच्या लोकप्रतिनिधींची आहे. लोकप्रतिनिधींनी सांगायला हवे की सकल मराठा समाजाला तुम्ही कसा न्याय देणार आहात. तेव्हाच बोलायचे. कोविड संपल्यानंतरदेखील तु्म्ही ठोस पावले उचलली नाहीत तर संभाजीराजांसह संपूर्ण मराठा समाज मुंबईपर्यंत लाँग मार्च करणार. तिथे तुम्हाला लाठी मारायची असेल तर पहिली लाठी मला मारावी लागेल. आम्हाला गृहीत धरू नका एवढेच सांगतो. पुढे त्यांनी माझा लढा 70 टक्के गरीब मराठ्यांसाठी आहे. आमची मागणी एकच आहे, आम्हाला न्याय द्या, असेही अधोरेखित केले.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply