अलिबाग ः जिमाका
कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या मदतीसाठी शासनाने ‘प्रधानमंत्री सहाय्यता निधी’, ‘मुख्यमंत्री मदत निधी कोविड-19’ आणि ‘जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी, रायगड’ तसेच अशी विशेष शासकीय खाती तयार केली आहेत. जिल्ह्यातील जे उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था जिल्हा प्रशासनाच्या बरोबरीने कोरोना विषाणूविरोधातील या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात, त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी प्रधानमंत्री सहाय्यता निधी, मुख्यमंत्री मदत निधी कोविड-19, तसेच जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी, रायगड या नावाने सुरू करण्यात आलेल्या शासकीय खात्यात सढळ हाताने मदतीची रक्कम जमा करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
‘जेएसडब्लूच्या कर्मचार्यांना भरपगारी रजा द्यावी’
रेवदंडा ः प्रतिनिधी
लॉकडाऊन कालावधीत नागावमधील जेएसडब्लू कंपनीतील कर्मचार्यांना भरपगारी रजा द्यावी, अशा मागणीचे निवेदनपत्र नागाव ग्रामपंचायत सरपंच निखिल मयेकर यांनी रायगड जिल्हाधिकार्यांना दिले आहे. कोरोनाच्या संकटकाळात लॉकडाऊन असतानाही जेएसडब्लूच्या साळाव व डोलवी येथे नागावमधील 12 ते 15 कर्मचारी कामावर जातात. प्रवासादरम्यान त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास नागाव परिसरातील इतर व्यक्तींनाही कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ही मागणी करण्यात आली आहे.
खून प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद

महाड ः प्रतिनिधी
महाड तालुक्यातील आंबिवली गावातील एका वयोवृद्ध महिलेच्या खून प्रकरणातील फरार आरोपीस महाड तालुका पोलिसांनी अटक केली आहे. ऐन संचारबंदी काळात तालुका पोलिसांनी ही कारवाई केल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. महाड तालुक्यातील आंबिवली गावातील द्रोपदी पांडुरंग पवार (74) ह्या 4 मार्च रोजी घरात मयत आढळून आल्या होत्या. या प्रकरणी महाड तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती, मात्र चौकशीअंती या मयत वयोवृद्ध महिलेचा खून झाल्याचा संशय पोलिसांना आला. यावरून यातील मयत वयोवृद्ध महिलेचा नातू रूपेश पवार (33) याला भोरमधून अटक करण्यात आली. अटक आरोपी रूपेशने आजीने वापरलेल्या अपशब्दामुळे अंगणातील फरशीने खून केल्याची कबुली दिली. या प्रकरणी वयोवृद्ध महिलेचा अंत्यविधी उरकण्यास मदत करणारे गावातील रमेश पवार, श्रीकांत मोहिते, सुधीर मोहिते यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला, मात्र अद्याप त्यांना अटक करण्यात आली नाही. त्यांच्यावर भा. दं. वि. कलम 302, 201, 202, 34अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खून प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कुचेकर, हवालदार व्ही. डी. सूळ, पोलीस नाईक तुषार लोळे यांनी करून आरोपीला अटक केली.